मालवण : मच्छिमार महिलांना सरसकट रोखीने पॅकेज द्यावे या मागणीसाठी जिल्हाभरातील मच्छिमार महिला मालवणात एकवटल्या. महिला मच्छिमारांच्या एकजुटीचा विजय असो... हम सब एक है, मच्छिमार महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन छेडले.
शासनाने मच्छिमार पॅकेजमधील लाभार्थ्यांना असलेल्या जाचक अटी मागे घेऊन रोखीने मदत देण्याचा निर्णय न घेतल्यास महिलांच्या न्याय हक्कासाठी व्यापक लढा उभारू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांनी दिला.मच्छिमार महिलांचे आक्रोश आंदोलन स्नेहा केरकर व चंद्रशेखर उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. बुधवारी सकाळपासून मत्स्य कार्यालयासमोरील रस्त्यावरच महिलांनी ठिय्या मांडल्याने हा मार्ग महिलांच्या गर्दीने भरून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी दुपारपर्यंत या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवत मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. या आंदोलनांला मच्छिमार संघटनांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी मालवणसह वायरी, तारकर्ली, देवबाग, तोंडवळी, आचरा, वेंगुर्ला आदी भागातील सुमारे चारशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.आंदोलनादरम्यान, डॉ. जितेंद्र केरकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश अंधारी, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सहकारी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, जिल्हा श्रमजीवी रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे, मिथुन मालंडकर, भाऊ मोर्जे आदींसह मच्छिमार महिला कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदविला. सिंधुदुर्गचा अतिरिक्त कार्यभार असणारे सहायक मत्स्य आयुक्त भादुले यांना स्नेहा केरकर व चंद्रशेखर उपरकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.कुटुंबनिहाय सर्व्हे करा!छोटू सावजी व दिलीप घारे यांनी श्रमिक मच्छिमार संघ व रापण संघटनेचा या आक्रोश आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. कुटुंबनिहाय सर्व्हे करून पॅकेजचा लाभ देण्यात यावा असे घारे यांनी सांगितले. मेघनाद धुरी यांनीही महिलांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.पॅकेजचे वाटप नाही!मत्स्य आयुक्त भादुले यांनी अद्याप पॅकेजचे कोणतेही वाटप झालेले नाही. त्यामुळे मच्छिमार महिलांच्या सर्व मागण्या आपण सरकारकडे मांडणार असून त्यानंतरच पॅकेजच्या वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.