रत्नागिरी : जिल्ह्यातील अधिकाधिक अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून देण्याकडे बँकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना केले. रत्नागिरी जिल्ह्यातील बँकांची जिल्हास्तरीय सल्लागार समिती तसेच जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. व्ही. बुचे, रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक आर. डब्ल्यू. साळुंखे, नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक व्ही. एस. पाटील, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन आदींसह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीत यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, यापैकी यंदा पीककर्ज घेतलेल्या जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे तीन ते पाच वर्षांच्या मुदत कर्जात रुपांतर करण्यात यावे तसेच या सर्व शेतकऱ्यांचे नवीन कर्ज विनाविलंब मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. गेल्या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेले ३५ हजार शेतकरी हा लाभ मिळण्यास पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना लवचिक धोरण अवलंबण्यात यावे, आपत्तीग्रस्तांच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याचे नाव नाही. परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्याचे नाव आहे आणि त्यांच्या सामाईक सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याचे नाव असेल, तर त्या शेतकऱ्यालाही नवीन कर्जासाठी पात्र समजण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. यासाठी महसूल व शासन यंत्रणा संपूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला. गेली दोन वर्षे कर्जाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रत्नागिरी जिल्हा पहिला क्रमांक मिळवत आहे. यावर्षीही जिल्ह्याने ३५ हजार शेतकऱ्यांना ३१२ कोटींचे पीककर्ज वाटप करुन १२१ टक्के उद्दिष्ट गाठले व राज्यात पहिला क्रमांक मिळविला, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, तसेच भविष्यात कर्जाची रक्कम ७०० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर आंब्याची, ९० हजार हेक्टरवर काजूची, तर सुमारे १ लाख हेक्टरवर इतर धान्याची लागवड होते. ही आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात कृषीकर्ज वाटपासाठी मोठी संधी आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या २८४ शाखा या संधीचं निश्चितच सोनं करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बुचे, साळुंखे, पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर यांनी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती मांडली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ द्या
By admin | Published: July 01, 2015 10:38 PM