वैभववाडी : नगरपंचायतीचा दर्जा देऊन युती शासनाने वाभवे - वैभववाडीला विकासाची संधी निर्माण केली आहे. शहराच्या विकासाला भरीव निधी येण्यासाठी केंद्र आणि राज्यात सत्ता असावी लागते. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या शहराचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी योग्य लोकांच्या हाती नगरपंचायती सत्ता द्या, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी रविवारी येथे केले.येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात आमदार नाईक यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तालुका प्रमुख अशोक रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, माजी अध्यक्ष टी. एस. घोणे आदी उपस्थित होते.नगरपंचायतीला दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपये विकास निधी शासन देते. तसेच प्रशासनही चांगले असते. त्यामुळे विकासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. ते नियोजन करण्यासाठी चांगली माणसं नगरसेवक म्हणून निवडून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. गेल्या निवडणुकीत अपवाद वगळता कोकणच्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. त्यामुळे युती शासनाच्या माध्यमातून कोकणात विकासाचे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीतर्फे लढविली जाणार आहे. अशी ग्वाही देत आमदार नाईक यांनी या शहराचा कायापालट करण्यासाठी जनतेने युतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.जयेंद्र रावराणे म्हणाले, एवढ्या कमी लोकसंख्येच्या शहराला नगरपंचायतीचा दर्जा युती सरकारमुळेच मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विचारधारेची सत्ता येथे असणे आवश्यक आहे. एक शौचालय बांधले म्हणजे विकास होत नाही. वस्ती तेथे सुलभ शौचालय, शहरात स्वतंत्र मासळी बाजार, पुरेसा नियमित पाणीपुरवठा बगिचा, तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याशिवाय वैभववाडी सुंदर बनवता येणार नाही. यावेळी वैभववाडी तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकर स्वामी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी संजय लोके यांनी शहरातील समस्या मांडून नगरपंचायत निवडणूकीत सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
योग्य लोकांच्या हाती नगरपंचायतची सत्ता द्या
By admin | Published: August 30, 2015 10:56 PM