सावंतवाडी : मोपा विमानतळावर भरती करताना पेडण्यासह सावंतवाडी, वेंगुर्ला व बांदा येथील स्थानिक युवकांना प्राधान्य द्या, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली.दरम्यान गोवा-बांबुळी येथील हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग मधील लोकांना प्राधान्याने सेवा दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पणजी येथे भेट घेतली. यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस महेश सारंग, एकनाथ नाडकर्णी, महेश धुरी, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री सावंत म्हणाले, धारगळ येथे सुरू होत असलेल्या आयुष हॉस्पिटलचा फायदा हा आता सिंधुदुर्गला मोठ्या प्रमाणात होणार आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्यानंतर येथे रोजगाराच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.मोपा विमानतळ पूर्ण ताकदीनिशी सुरू झाले आहे. भविष्यात या ठिकाणी विदेशी विमाने उतरणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी लागणार आहेत. पेडण्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी जवळच्या भागातील युवकांना याठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तेली यांनी केली. याला सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत बऱ्याचशा युवकांना या ठिकाणी रोजगार देण्यात आला आहे. भविष्यात सुद्धा नव्याने भरती असताना त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी विचार करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले.
मोपा विमानतळावरील भरतीत सिंधुदुर्गातील युवकांना प्राधान्य द्या, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजन तेलींची मागणी
By अनंत खं.जाधव | Published: March 07, 2023 5:50 PM