सावंतवाडी : चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने मनावर चांगले संस्कार होतात. यासाठीच संस्कारक्षम साहित्य विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी पालकांची आणि शिक्षकांची आहे. चांगली पुस्तके पालकांनी वाचावीत व आपल्या मुलांना वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करावा. तरच वाचन संस्कृती विकसित होईल, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांनी केले. श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली यांच्यावतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष भरत गावडे, सचिव लवू सावंत, केंद्रप्रमुख शिवाजी गावित, मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ, विठ्ठल सावंत, श्रीकृष्ण सावंत, प्रशांत सुकी, गुंडू गोरे, केंद्रमुख्याध्यापक अरुण म्हाडगूत, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांच्या हस्ते झाली. यावेळी देसाई म्हणाले, मराठी साहित्यात खूप चांगली पुस्तके आहेत. त्यांचा परिचय मुलांना होणे गरजेचे आहे. या वयात मुलांनी साने गुरूजी, आचार्य विनोबा भावे, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचावीत, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दाणोली केंद्रशाळा ते साटम महाराज मंदिर अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये दाणोली हायस्कूलने सादर केलेला संतांच्या जीवनावर आधारीत चित्ररथ लोकांचे खास आकर्षण ठरला आहे. या ग्रंथदिंडीत देवसू हायस्कूल, धवडकी हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला. यानंतर मुलांसाठी मनाचे श्लोक पाठांतर, गीताई पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या तीन स्पर्धात ४५ मुले सहभागी झाली होती. परीक्षण माधुरी चव्हाण, करुणा जाधव, सागर मेस्त्री, भरत गावडे यांनी केले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना वाचनासाठी संस्कारक्षम पुस्तके द्या
By admin | Published: December 16, 2014 9:53 PM