कणकवली: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच जमीनदारांना मोबदला दिलेला नाही. ओसरगाव टोल नाक्याजवळ वाहन चालकांना आवश्यक सुविधा नाहीत. मात्र, सिंधुदुर्ग उपप्रादेशिक विभागाकडे नोंदणी झालेली व एम.एच.०७ पासिंगच्या वाहनांना टोल माफी द्यावी. अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. परशुराम उपरकर म्हणाले, खारेपाटण ते झाराप या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांमध्ये ओसरगाव येथे टोल नाका निश्चित करण्यात आला आहे. या टोल नाक्यासाठी फेरनिविदा काढून ठेकेदारही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काम अपुरे असताना येथे टोल वसुलीचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरटीओ पासिंग वाहनाना टोल माफी मिळावी ही प्रमुख मागणी आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक पंदरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम अद्याप अपूर्ण असून जमीनदारांना मोबदला मिळालेला नाही. ओसरगाव टोल नाक्यावर सुविधा नाहीत. त्यामुळे टोल वसुली करू नये असे पत्रात म्हटले आहे.मात्र, असे असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग रत्नागिरी कडून टोल वसुलीसाठी फेरनिविदा काढून ओसरगाव येथे टोल घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याचे काम पूर्ण न करता टोल सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामाची उदाहरणे असताना टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. याला जिल्ह्यातील व्यापारी, वाहतूकदार यांना नाहक टोल भरावा लागणार आहे. देवगड, वैभववाडी आणि कणकवली येथून ओरोसमध्ये जाणाऱ्या वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे.कणकवलीतून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही ६५ किलोमीटरचा टोल भरावा लागणार आहे. हा वाहन चालकांवर होणारा अन्याय आहे. यासाठी मनसेने तीव्र आंदोलन यापूर्वी केलेले आहे. आता टोल वसुली सुरू झाल्यास आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करू. असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. हे निवेदन देताना मनसेच्या शिष्टमंडळामध्ये दया मेस्त्री, कुडाळ येथील प्रसाद गावडे, प्रथमेश धुरी, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी
By सुधीर राणे | Published: December 22, 2022 1:07 PM