कणकवली : देशात पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील काजूला भारत सरकारकडून (जिओग्राफीकल इंडिकेशन- जी. आय.) अर्थात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन प्राप्त झाल्याने सिंधुदुगार्तील काजूला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.
सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रियाधारक यांनी हे जीआय मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कोकण काजू समुहाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती करावी. असे आवाहन कोकण काजू समुहाचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर व उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र्र मुंबरकर यांनी केले आहे.कोकण काजू समुहाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सिंधुदुर्गच्या काजूला भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी कोकण काजू समूह, सिंधुदुर्ग व रत्नागिरी- सिंधुदुर्ग महा कोकम संस्था, विरण यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काजू उद्योजक प्रमोद भोगटे, प्रकाश पावसकर, सुहास पालव , अंकुश सावंत, मंगेश नेवगे, कमलाकर घोगळे आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश नेरुरकर म्हणाले, जी. आय. मानांकन म्हणजे सिंधुदुर्गातील काजूला खास दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये सिंधुदुगार्तील काजूला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.त्याचबरोबर येथील काजूला वेगळा दर्जा प्राप्त होवून त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने पयार्याने सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रती किलो सुमारे १८० ते २०० रुपये दर मिळण्यास मदत होणार आहे.जी. आय. म्हणजे भौगोलिक मानांकन असते. एखाद्या ठिकाणच्या वातावरण, माती, हवामान अशा भौगोलिक परिस्थितीमुळे विशिष्ट वस्तू इतर भागापेक्षा वेगळी असते. आपल्या सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती व लाल माती मधील काजूची चव देशातील इतर कोणत्याही काजू पेक्षा वेगळी आहे. हे शासनाच्या संबधित विभागा समोर सिद्ध करावे लागते. यासाठी जी.एम. जी. सी. पुणे येथील प्रोफेसर हिंगमीरे यांनी योग्य पध्द्तीत आपल्या काजूची मांडणी शासनासमोर केली आहे. त्यामुळे काजूला जी.आय. मानांकन मिळणे सोपे झाले आहे.