दोडामार्ग : गोव्यातील धनदांडग्या लोकांना जमिनी विकत घेता याव्यात आणि मायनिंग तसेच इतर विनाशकारी प्रकल्प सुरु करता यावेत यासाठी काही लोकांना हाताशी धरून दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनीकरणाचा डाव आखला जात आहे, असा गौप्यस्फोट करीत तळेखोल येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खरेदी केलेला ७ एकर जमिनीचा व्यवहार हा त्याचीच एक झलक आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी केला.दोडामार्ग येथील सेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वझरे सरपंच लक्ष्मण गवस, गोपाळ गवस, युवासेना उपतालुकाध्यक्ष भगवान गवस, कानू दळवी उपस्थित होते.धुरी म्हणाले, गोव्यातील धनदांडग्या लोकांचा दोडामार्ग तालुक्यातील जमिनीवर डोळा आहे. त्यांना या जमिनी विकत घेऊन या ठिकाणी मायनिंग आणायचे आहे. शिवाय इतर विनाशकारी प्रकल्प आणून स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे.त्यासाठी तालुक्यातील काही लोकांना त्यांनी हाताशी धरून तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असे सांगत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले.गवस म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत गोव्याचे मंत्रिमंडळ अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात का उतरले होते हे आता ध्यानात येत असून, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तळेखोल येथे १५ दिवसांपूर्वी ७ एकर जमिनीचा खरेदी व्यवहार केलेला आहे.
ज्यात काळा दगड व क्रशर आहे. विनाशकारी प्रकल्प तालुक्यात आणण्याचा हा एक ट्रेलर आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच खरेदी व्यवहाराची प्रतही त्यांनी पुरावा म्हणून पत्रकारांसमोर सादर केली.बंद लखोट्यात दडलेय काय?शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठविली. पण त्याचबरोबर एक बंद लखोटाही पत्रकारांना दाखविला. त्यात गोव्यातील धनदांडग्यांना जमीन विकणाऱ्यांची नावे असून एक सीडीही असल्याचे सांगितले.
दोडामार्ग विलिनीकरणाची चळवळ वेळीच थांबली नाही तर ही नावे व त्यातील सीडी उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला. या लाखोट्यात नेमके दडलेय काय? आणि ती सीडी नेमकी कसली आहे? याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.