सावंतवाडी : सातार्ड्याहून गोव्याच्या दिशेने दुचाकीवरून थ्रीपल सीट जाणाऱ्या युवकांना सातार्डा येथील पोलीस दूरक्षेत्रावर अडवल्याचा राग मनात धरून गोवापोलिसातील कर्मचाऱ्याने दूरक्षेत्रावरील पोलिसांवरच हल्ला करत शिवीगाळ केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. यात दूरक्षेत्रावरील पोलिसांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून हल्ला करणाऱ्या पोलिसांवर उशिरापर्यत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, या घटनेनंतर सातार्डा दूरक्षेत्र परिसरात मोठी गर्दी झाली होती.
सातार्डा येथे कामानिमित्त एकाच दुचाकीवरून गोवा येथून पोलीसासह तिघे जण आले होते. ते पुन्हा सायंकाळी गोव्याच्या दिशेने परतत असताना त्यांची दुचाकी सातार्डा दूरक्षेत्रावर आली. यावेळी दूरक्षेत्रावर पोलीस कर्मचारी हिरामण चौधरी हे कार्यरत होते. त्यांनी ही दुचाकी थांबवली आणि एका दुचाकीवरून तिघे कसे काय जाता, असे विचारले. त्यावेळी दुचाकीवर चालकाचे काम करणारे गोवा पोलीस कर्मचाऱ्यांना राग आला. त्यांनी दूरक्षेत्रावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यातूनच गोवा पोलीस कर्मचाऱ्याने गाडी थांबवल्याचा राग मनात धरून दूरक्षेत्रावरील कर्मचारी हिरामण चौधरी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे वातावरण आणखीच चिघळले. त्यानंतर, परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती. त्यातच सातार्डा दूरक्षेत्र हे गोव्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने गोवा परिसरातील काही नागरिक तेथे गोळा झाले. तसेच सातार्डा येथीलही ग्रामस्थांनी धाव घेतली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार असे वाटल्यामुळे दूरक्षेत्रावरून सावंतवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यामुळे, तात्काळ सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव तेथे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यानंतर परिस्थती नियंत्रणात आणली. तरीही किरकोळ बाचाबाची सुरूच होती. अखेर गोवा पोलीस कर्मचाऱ्यासह इतर दोघा युवकांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. मात्र, गुन्हा दाखल झाला नाही.