लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा-आंबोली मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या मालवाहू गाडीसह आठ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संभाजी प्रकाश सावंत (वय ३८, रा. पारपोली-गुरववाडी, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी रात्री उशिरा सातुळी बावळाट येथे ही कारवाई केली.बांदा-आंबोली मार्गावरून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे सिंधुदुर्ग अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गावर उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांनी सहकाऱ्यांसमवेत गस्त घालण्यास सुरुवात केली. गोव्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, गोव्यातून येणाऱ्या मालवाहू गाडीला (एमएच ०७ पी १६५७) तपासणीसाठी थांबविण्यात आले. या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांची दारू असलेले ४२ बॉक्स आढळून आले.या अवैध दारू वाहतूकप्रकरणी गाडीचालक संभाजी सावंत याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, जवान संदीप कदम, आर. डी. ठाकूर, मानस पवार, दीपक वायदंडे यांनी केली.या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या बॅगपाईपर व्हिस्कीचे ३ बॉक्स (२८ हजार ८०० रुपये), आॅफिसर चॉईस व्हिस्कीचे १५ बॉक्स (१ लाख ४४ हजार रुपये), मॅक्डोल थ्री एक्स रमचे ३ बॉक्स (२८,८०० रुपये), रॉयल स्टॅग व्हिस्कीचे ३ बॉक्स (२३ हजार ४०० रुपये), इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे ३ बॉक्स (२३ हजार ४०० रुपये), मॅक्डोल नं १ व्हिस्कीचे ५ बॉक्स (४८ हजार रुपये), किंगफिशर बियर टिनचे पाच बॉक्स (१४ हजार ४०० रुपये) व टुबर्ग बिअर टिनचे ५ बॉक्स (१४ हजार ४०० रुपये) अशी ३ लाख २५ हजार २०० रुपयांची दारू व पाच लाख रुपयांची गाडी जप्त करण्यात आली.
गोवा बनावटीची चोरटी वाहतूक
By admin | Published: June 08, 2017 11:06 PM