वेंगुर्ला : आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी ५० क्लस्टरच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केली.केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील कल्पतरू क्वायर औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान, हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम महिला औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प वेंगुर्ला येथील सभागृहात झाला.
देशात १८ राज्यांत एकाच वेळी स्फूर्ती अंतर्गत ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडित ४२ हजार कारागिरांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. देश विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न असून त्यासाठी गाव समृद्ध, संपन्न व शक्तिशाली होणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक एम. के. गावडे, महिला काथ्या संचालिका प्रज्ञा परब, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, नीलम क्वायर औद्योगिक संस्थेच्या गीता परब, सनराइझ क्वायर औद्योगिक संस्थेच्या श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, अश्विनी पाटील यांच्यासहित मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.एमएसएमईच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना उभारी मिळत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व एमएसएमई विभागाचे सर्व अधिकार यांचे एम. के. गावडे यांनी आभार व्यक्त केले.कारागिरांनी एकत्र यावेउत्कृष्ट कारागीर व हस्तकला अवगत असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत प्रत्येक मतदारसंघात दहा क्लस्टर निर्माण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मागणीनुसार उत्कृष्ट मालाची निर्मिती करणे गरजेचे आहे. गाईच्या शेणापासून उत्पादित केलेल्या रंगाला जगात मागणी असून देशात प्रत्येक गावात रंगाची फॅक्टरी सुरू करणे आपले ध्येय असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.