सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात कोकण विभागात मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल या ग्रुप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ही ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.केंद्र सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरूकेले आहे. या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शासन निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच अभिनव योजना याची माहिती आॅनलाईन पद्धतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव स्वरूपात पाठविण्यात आली होती. कोकण विभागातून सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत.या स्पर्धेत सिंधुदुर्गातील गोळवण या ग्रामपंचायतीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवीत कोकणात अव्वल क्रमांक पटकावला आहे. या ग्रामपंचायतीचे वैशिष्ट म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजनेचा व अभियानाचा प्रारंभ या गावातून केला जातो. त्यामुळे प्रत्येक योजना, अभियान यशस्वी करणारी ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात या ग्रामपंचायतीने ओळख निर्माण केली आहे. गौरव ग्रामसभा स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, तंटामुक्त व निर्मलग्राम पुरस्कार या ग्रामपंचायतीने आधीच प्राप्त केला आहे. शासनाने निर्मलग्राम अभियान रद्द करून नव्याने सुरू केलेल्या हागणदारीमुक्त टप्पा दोनमध्येही या ग्रामपंचायतीने यश प्राप्त केले आहे. पर्यावरण विकासरत्न पुरस्कारप्राप्त असणाऱ्या या ग्रामपंचायतीने जागतिक बँकेच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य प्रकल्प व केंद्राच्या हरियाली प्रकल्पामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल विद्यमान सरपंच प्रज्ञा चव्हाण, तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच सुभाष लाड, ग्रामसेवक बी. एम. बालम तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन होत आहे. राज्यातून एकूण १५ ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यात गोळवण ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींचे मूल्यांकन भोपाळ राज्यस्तरीय समिती करणार आहे. (प्रतिनिधी)
गोळवण-कुमामे-डिकवल ग्रुप ग्रामपंचायत प्रथम
By admin | Published: February 10, 2016 10:14 PM