वैभववाडी : विनामोबदला चार महिने काम करूनसुद्धा मुलाच्या नावावर नगरपंचायतीच्या हजेरी पत्रकात पट्टी लावून त्याजागी एका युवतीची स्वाक्षरी घेतल्याचे समजताच वाभवे-वैभववाडी येथील अनिता मनोहर करकोटे यांनी दोन्ही मुलांसह रॉकेलचे कॅन घेऊन आत्मदहनाच्या तयारीनिशी नगरपंचायत कार्यालय गाठले. तेथे जाब विचारल्यानंतर दालनाला बाहेरून कडी घालून काही कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यानंतर त्यांच्या मुलाची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेण्याची सूचना प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दूरध्वनीवरून देत त्याचा अनुकंपांतर्गत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे काही वेळाने कडी उघडण्यात आली.मनोहर केशव करकोटे हे ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असताना दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यानंतर वर्षभरात ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे अनुकंपांतर्गत सचिन मनोहर करकोटे याला नगरपंचायत सेवेत सामावून घेण्यासाठी त्याची आई अनिता करकोटे यांचा गेली साडेतीन वर्षे संघर्ष सुरू आहे.दरम्यान, सचिनचा अनुकंपाखाली प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन देत त्याला तात्पुरत्या सेवेत घेऊन ८ मार्च २०१९ पासून नगरपंचायतीच्या हजेरी पत्रकावर त्याची स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. जुलै महिन्याचे काही दिवस गेल्यानंतर सचिनला हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास नगरपंचायत प्रशासनाने प्रतिबंध केला.या प्रकारामुळे संतापलेल्या सचिनच्या आईने (अनिता करकोटे) सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन रॉकेलच्या कॅनसह नगरपंचायत कार्यालय गाठले. अनिता करकोटे या नगरपंचायतीत पोहोचल्यावर त्यांनी मुलगा सचिन याला हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यास प्रतिबंध केल्याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला.त्यानंतर कर्मचारी बसलेल्या दालनाला त्यांनी बाहेरून कडी घालून काही कर्मचाऱ्यांना कोंडून घातले. दरम्यान, या प्रकाराची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रभारी मुख्याधिकारी कंकाळ यांना दिली. त्यामुळे त्यांनी हजेरी पत्रकावर सचिन करकोटे याची स्वाक्षरी घेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी अनिता करकोटे यांना त्याबाबत कल्पना दिल्यावर दरवाजाची कडी उघडण्यात आली.त्यानंतर कंकाळ यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतीने लिपिक एस. व्ही. पवार हे सचिन करकोटे याचा अनुकंपांतर्गत प्रस्ताव घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले. दरम्यान, अनिता करकोटे चक्क रॉकेलचे कॅन घेऊन दोन्ही मुलांसह नगरपंचायतीत दिसताच उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. करकोटे यांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचारी भांबावून गेले होते. परंतु, करकोटे यांनी कोणताही अनुचित प्रकार न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.चार महिन्यांचा पगार कधी देणार ?सचिन करकोटे याने ८ मार्च २०१९ पासून जुलै महिन्याचे काही दिवस नगरपंचायतीच्या कर्मचारी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून येते. परंतु, मार्च ते जून या चार महिन्यांत त्याला छदामही दिला नसल्याचा आरोप करीत हा थकित पगार कधी देणार? अशी विचारणा त्याची आई अनिता करकोटे यांनी कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र, याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारा, असे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले.कर्मचारी हजेरी पत्रकात छेडछाडनगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकात छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार वाभवे-वैभववाडीतील अनिता मनोहर करकोटे यांनी उघडकीस आणला. चार महिने त्यांच्या मुलाने शिपाई म्हणून नगरपंचायतीच्या हजेरीपत्रकावर स्वाक्षरी केली असताना त्याच्याजागी एका युवतीच्या नावाची पट्टी चिकटवून त्यावर तीन दिवस युवतीच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत.
करकोटे यांनी हजेरी पत्रकावर पूर्वीप्रमाणे आपल्या मुलाची स्वाक्षरी करून घेण्याचा हट्ट धरल्याने काही वेळानंतर युवतीच्या नावाची ती चिकटवलेली पट्टीही काढून टाकण्यात आली. हजेरी पत्रकातील छेडछाडीचा गंभीर प्रकार उघड झाल्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.