वेंगुर्ले : कविता लेखन हा गंभीरपणे विचारात घेतला जाणारा वाङ्मय प्रकार आहे. प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या प्रकारच्या कवितांची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन कवी वीरधवल परब यांनी केले. यावेळी त्यांनी समकाळातील सामाजिक, राजकीय, वास्तवाचा आढावा घेतला. सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्लेतील पहिल्या मराठी साहित्य संमेलनातील कवितासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सत्रात उपस्थित कवींनी एकापेक्षा एक गंभीर आशयाच्या कविता सादर करून संमेलनाला वैचारिक पाठबळ मिळवून दिले. ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी ‘हाकेतून हद्दपार होत आहे आई’ ही कविता सादर करून आपल्या मातृभाषेसह बोलीभाषांचा समृद्ध वारसा जपण्यासाठी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘आपली नाळ ज्या गावात पुरली गेली, त्या मातीचे ऋण नाही फेडता आले आपल्याला अजून...’ अशी खंत त्यांनी आपल्या कवितेतून सादर केली. या कवी संमेलनात जिल्ह्यातील नामवंत कवयित्री उषा परब, डॉ. तरुजा भोसले, वैशाली पंडित यांनी स्त्रीवादी जाणिवेच्या कविता सादर करून आजच्या काळात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षेचे प्रत्ययकारी चित्र रसिकांसमोर उभे केले. उदयोन्मुख कवयित्री मधुरा आठलेकर यांनी माणसाच्या हसण्यामागील तऱ्हेतऱ्हेच्या कारणांचा आणि त्यायोगे होणाऱ्या गफलती आपल्या कवितेतून सादर केल्या. प्राजक्ता आपटे यांनी मानवीय जगण्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बहुजनवादी चळवळीतील वैचारिक गोंधळ व आत्मकेंद्रीपणाची वृत्ती वाढीस लागली असली, तरी खरा कार्यकर्ता असल्या भ्रामक चळवळींनी भुलणार नाही, अशी स्पष्टोक्ती मनीषा जाधव यांनी व्यक्त केली. मधुकर मातोंडकर यांनी माणसा-माणसांमधील तुटत चाललेल्या संवादावर भाष्य केले. ज्येष्ठ कवी लिलाधर घाडी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा संदर्भ देत मानवतेची भावना वैश्विक असण्याची गरज व्यक्त केली. गोविंद पायनाईक, मृण्मयी बांदेकर, स्नेहा राणे, अजित राऊळ, प्राजक्ता गवळी, सोनाली नाईक यांनीही कविता सादर केल्या. संमेलनाच्या शेवटी वीरधवल परब यांनी ‘बा देवा म्हाराजा गवळदेवा’ ही मालवणी बोलीभाषेतील कविता सादर केली. या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन विठ्ठल कदम, स्मिता राऊळ यांनी केले, तर आत्माराम सोकटे यांनी आभार मानले. (वार्ताहर) भोसले, नानिवडेकरांना रसिकांकडून वाहवा उषा परब यांनी आधुनिक काळातील जगण्याच्या भिन्न भिन्न पातळ्यांवरील स्पर्धांमुळे जी व्यामिश्रता व संवादाच्या पातळीवर तुटलेपणा आल्याचे सूचित केले. वैशाली पंडित यांनी आई-मुलांच्या नात्यातील जवळीक व निरपेक्षता आजच्या धकाधकीने संपवून टाकल्याची व्यथा आपल्या कवितेतून व्यक्त केली. डॉ. तरुजा भोसले व मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या गझलांमधून उपस्थितांकडून चांगलीच वाहवा मिळविली. रघुवीर परब यांनी आपल्या कवितेतून रसिकांना आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यजाणिवेच्या प्रवाहाशी नेऊन भिडविले. कवी अरुण नाईक यांनी तळ फाटलेल्या ट्रंकेचे आत्मचरित्र कवितेतून सादर केले, तर विठ्ठल कदम यांनी हमरस्ता कवितेतून आजच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रातला गोंधळ व्यक्त केला. भोसले, नानिवडेकरांना रसिकांकडून वाहवा उषा परब यांनी आधुनिक काळातील जगण्याच्या भिन्न भिन्न पातळ्यांवरील स्पर्धांमुळे जी व्यामिश्रता व संवादाच्या पातळीवर तुटलेपणा आल्याचे सूचित केले. वैशाली पंडित यांनी आई-मुलांच्या नात्यातील जवळीक व निरपेक्षता आजच्या धकाधकीने संपवून टाकल्याची व्यथा आपल्या कवितेतून व्यक्त केली. डॉ. तरुजा भोसले व मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या गझलांमधून उपस्थितांकडून चांगलीच वाहवा मिळविली. रघुवीर परब यांनी आपल्या कवितेतून रसिकांना आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यजाणिवेच्या प्रवाहाशी नेऊन भिडविले. कवी अरुण नाईक यांनी तळ फाटलेल्या ट्रंकेचे आत्मचरित्र कवितेतून सादर केले, तर विठ्ठल कदम यांनी हमरस्ता कवितेतून आजच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रातला गोंधळ व्यक्त केला.
प्रतिकूल परिस्थितीतच चांगल्या कविता
By admin | Published: February 19, 2015 9:56 PM