सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.गरीब, गरजू व कष्टकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. २६ जानेवारी २०२० मध्ये एकाच दिवशी राज्यभरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील डीआरडीए येथे केंद्र स्थापन करून शुभारंभ केला. सुरुवातीला थाळीची किंमत १० रुपये होती. दोन चपात्या, भाजी, आमटी व भात असा आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाच्या काळात या थाळीची किंमत कमी करण्यात आली.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या काळात मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेर गावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी थाळीची किंमत कमी करण्यात आली होती.या थाळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या १२ केंद्रे सुरू आहेत. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यात थाळीची प्रतिदिन मर्यादा १०० आहे तर इतर पाच तालुक्यांत हीच मर्यादा ७५ थाळींची आहे. दर पंधरा दिवसांनी शिवभोजन केंद्र चालकांचे बिल अदा केले जाते. या योजनेसाठी पुरेसा निधी सरकारकडून प्राप्त होत आहे.शिवभोजन थाळी योजना यशस्वीशिवभोजन थाळीला गरीब व गरजू नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी सुरू झालेली शिवभोजन थाळी ही योजना आज खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसून येत आहे. गेल्या १३ महिन्यांत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत या थाळीचा १ लाख ८४ हजार ५६६ जणांनी लाभ घेतला आहे.प्रतिष्ठित व्यक्तीही घेतात या योजनेचा लाभया योजनांचा लाभ गरीब व गरजू नागरिकांनी घ्यावा असे सरकारने म्हटले आहे. परंतु बऱ्याच वेळा काही कर्मचारी, धनधांडगे नागरिक या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा खरे लाभार्थी बाजूलाच राहतील व लाभ दुसरेच घेतील असे व्हायला नको.
सिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद :दादासाहेब गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 5:53 PM
shiv bhojnalaya Sindhudrg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.
ठळक मुद्देसिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद :दादासाहेब गीते १३ महिन्यांत १ लाख, ८४ हजार ५६६ गरजूंनी घेतला लाभ