कणकवली : राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली विभागाच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे ४८,५१,४८० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. या मद्यसाठयाची वाहतूक एक सहाचाकी सील लावलेल्या कंटेनरमधून छुप्या पद्धतीने करण्यात येत होती.या प्रकरणी विक्रांत विवेक मलबारी (वय ३३ , रा.ओरोस, ख्रिश्चनवाडी ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे ४५० बॉक्स,बिअरचे ६३ बॉक्स व वाहनाच्या किमतीसह एकूण ५५,११,४८०रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, जमदाजी मानेमोड, जवान शिवशंकर मुपडे, रणजित शिंदे, स्नेहल कुवेसकर मदतनीस गोट्या सुर्वे, सला खान यांचेसह भरारी पथक,सिंधुदुर्ग यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संतोष पाटील हे करीत आहेत.
ओसरगावात ४८ लाखांच्या मद्यासह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By सुधीर राणे | Published: September 13, 2022 6:49 PM