कणकवली : सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मेगा फूड पार्कमुळे खात्रिशीर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. टोमॅटो, पेरू उत्पादनासाठी बजाज फूडपार्क शेतकऱ्यांना सहकार्य करीत असून आता मध उत्पादनासाठी आम्ही बाजार पेठ उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी आहे, असे प्रतिपादन बजाज मेगा फूड पार्कचे संचालक यतीन मयेकर यांनी गोपुरी आश्रमात आयोजित कार्यशाळेत केले.गोपुरी आश्रम आणि बजाज मेगा फूडपार्क कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, डॉ. आनंद तेंडुलकर, खादी ग्रामोद्योग महासंघाचे दिलीप वाडेकर, गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, नारळ विकास संघाचे खजिनदार रामानंद शिरोडकर, सुधीर जडये, कृषीचे यशवंत गव्हाणे, आदी उपस्थित होते. यतीन मयेकर म्हणाले की, सावंतवाडीत बजाज मेगा फूडपार्क उभारला जात आहे. एका स्मार्ट सिटीसारखाच हा फूडपार्क असेल. फळप्रक्रियेसाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्री या फूडपार्कमध्ये असणार आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांनी उत्पादित माल गोळा करण्यासाठी शीतगृहे आणि कलेक्शन सेंटर्स असतील. त्यानंतर अर्धप्रक्रिया केंद्रे जिल्ह्यातील काही ठिकाणी उभारली जातील. असेप्टिक पॅकेजिंग युनिट मेगा फूडपार्कमध्ये असणार आहे. दिवसाला ६०० मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या मेगा फूडपार्कमध्ये असणार आहे. डॉ. प्रसाद देवधर म्हणाले की, मेगा फूडपार्कसारख्या प्रकल्पांमुळे येथील अर्थशास्त्र बदलणार आहे. पुढील काळ हा शेतकऱ्यांना चांगला आहे. मधुमक्षिका पालन, शेळीपालन, गाय पाळण्याएवढे सोपे नाही. मधमाशांना बंदिस्त ठेवले जाऊ शकत नाही. मात्र, योग्य तंत्राच्या आधारे त्यांच्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते. मधुमक्षिका पालनामुळे शेती उत्पन्नातही ३० टक्के वाढ होते. मटका लावण्याचा येथील शेतकरी जेवढा गांभीर्याने विचार करतो. तेवढा जर शेतीचा विचार केला तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती चांगली होईल. सुभाष मयेकर म्हणाले की, आंबा पीक घटत चालले आहे. शेतकऱ्याच्या हातात पैसा खेळता राहिला, तर शेतकरी सुखी राहणार आहे. येथील जमिनीचे तज्ज्ञांनी सर्वेक्षण केले असता ही जमीन बाराही महिने उत्पादन देणारी असल्याचे स्पष्ट झाले. परागीभवनामुळे शेती उत्पन्नात वाढ होते. यासाठी मधुमक्षिका पालन आवश्यक आहे. सांगेली येथील मधुमक्षिका पालन करणारे सुधीर जडये, डॉ. आनंद तेंडुलकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत गव्हाणे यांनी केले. शेतकऱ्यांना सवलतकंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८० हजार टोमॅटो रोपांचे वाटप केले आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले. ही लागवड यशस्वी झाली असून, आता पेरूची लागवड केली जात आहे. पुढील टप्प्यात मधावर प्रक्रिया केली जाणार असून, शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीत मधपेट्या दिल्या जाणार आहेत.
गोपुरीत शेतकऱ्यांची कार्यशाळा
By admin | Published: March 18, 2016 9:12 PM