महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला आधीच आरक्षण दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ती अंमलबजावणी व्हावी, अशी आपली मागणी आहे. आता ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही. राज्यातील सर्व भटके विमुक्त जाती, जमाती यांचा मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाला पुढाकार घेऊन सर्वांना न्याय द्यायचा आहे, असे आवाहन धनगर समाज नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे धनगर आरक्षण जागर यात्रेत केले.
सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात धनगर आरक्षण जागर यात्रा आमदार पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शिवराज बीडकर, बाळा गोसावी, नवलराज काळे, राजेश जानकर, कानू शेळके, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, दीपा ताटे, किशोर वरक, सुरेश झोरे, बाळा कोकरे, देऊ जंगले, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुशील खरात, भरत गोरे आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून आणि धनगर समाजातील महान व्यक्तींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जागर यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी श्यामसुंदर मोडक, किशोर वरक, नवलराज काळे, कानू शेळके यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी आमदार पडळकर म्हणाले, १९६१ पासून धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. आपण २०१८ मध्ये यासाठी आंदोलन हातात घेतले. तेव्हापासून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते. धनगरांच्या बाजूने आपण १७० पुरावे दिले आहेत. निकाल १०१ टक्के आपल्या बाजूने लागणार आहे. परंतु आपल्याला शांत बसायचे नाही. मिळालेले आरक्षण लागू करणे हा प्लॅन ‘ए’ आहे. तर रस्त्यावर उतरून लढाई करायची, हा प्लॅन ‘बी’ आहे. यासाठी राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यायचे आहे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.