चिपळूण : राज्य शासनाने घरपट्टीवरील स्थगिती उठवताना नवीन धोरणानुसार जी घरपट्टी आकारणी सुचविली आहे ती सर्वसामान्य माणसावर अन्याय करणारी आहे. ही घरपट्टी भांडवली मूल्यांवर आधारित होणार आहे, पण आता दर कमी केले आहेत. टोलमाफी करुन श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडत आहे. हे सरकार धनदांडग्यांचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकारने घरपट्टी आकारणीवर स्थगिती आणली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, घरपट्टीवादावर अधिसूचनेचा तोडगा काढण्यात आला आहे. भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खताते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार १ हजार रुपयांवर ३० पैसे किमान व कमाल २ रुपयापर्यंत कर आकारणी केली जाणार आहे. जुन्या अधिसूचनेत १०० रुपयांवर कर आकारण्यात येणार होता. त्याला ग्रामपंचायतीकडून विरोध झाल्याने नवीन अधिसूचना काढून भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी पद्धतीत बदल केला आहे. यामुळे कराची रक्कम कमी होईल. तरीही वार्षिक घरपट्टी किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. राज्यात सरकार धनदांडग्यांना टोलमाफी देते व सामान्यांना मात्र घरपट्टीवाढीसारखे चटके देते. सरकारने ७ डिसेंबरपर्यंत हरकती मागितल्या आहेत. याचा विचार सर्व ग्रामपंचायतींनी करुन आपल्या हरकती नोंदवायला हव्यात, असेही खताते यांनी स्पष्ट केले. या सरकारला शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे व सामान्य माणसांशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता पाग महिला विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
हे धनदांडग्यांचे सरकार : जयंद्रथ खताते
By admin | Published: December 01, 2015 10:39 PM