रत्नागिरी : निरीक्षणगृहातील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय २०१२ साली झाला होता. त्यात बदल करून ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे त्याचे नामकरण करण्यात आले होते. मात्र, शासनाला या महोत्सवाचा विसर पडला असून, गेल्या वर्षीपासून हा महोत्सव झालाच नाही. निरीक्षणगृह आणि बालगृह संस्थेतील बालकांसाठी राज्यस्तरीय क्रीडा मेळावा घ्यावा, असा निर्णय २००२ साली घेण्यात आला होता. त्यावेळी या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी केवळ दोन लाख रुपये अनुदान मिळत होते.या तूटपुंज्या अनुदानात राज्यस्तरावर मेळावा आयोजित करण्यात अडचणी होत्या. पण, निरीक्षणगृह आणि बालगृहातील मुला-मुलींच्या या आनंदात भर घालण्यासाठी २०१२ साली तत्कालीन आघाडी सरकारने शासन निर्णयात महत्त्वपूर्ण बदल केला. त्यानुसार या मेळाव्याचे ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ असे नामकरण करण्यात आले.हा महोत्सव जिल्हा आणि विभागस्तरावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हास्तरावर पाच लाख रुपये आणि विभाग स्तरावरदेखील पाच लाख रुपये अनुदान वितरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या मुला-मुलींच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा ठरत आहे. सन २०१२मध्ये शासन निर्णय झाल्यानंतर २०१३ला हा बाल महोत्सव साजरा केला झाला. पण, राज्यात शासनकर्ते बदलल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या युती शासनाला मात्र या महोत्सवाचा विसर पडलेला दिसतो. युतीचे शासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर हा बाल महोत्सव साजरा झालेला नाही. २०१५मध्ये हा बाल महोत्सव साजरा होईल की नाही, याबाबत शंका आहे. कारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा महोत्सव साजरा होणे शासन निर्णयात अपेक्षित आहे. अद्याप शासनाने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता यावर्षीही चाचा नेहरू बाल महोत्सव होण्याची शक्यता धूसर झाली आहे. (प्रतिनिधी) आभास फाऊंडेशनच्या वतीने आम्ही मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी निवेदन दिले आहे, मात्र, येत्या विधिमंडळ अधिवेशन काळात हा मुद्दा सभागृहात मांडणे आवश्यक असून, त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.- अतुल देसाई, आभास फाऊंडेशन, कोल्हापूर.
शासनाला ‘बाल महोत्सवा’चा विसर
By admin | Published: November 11, 2015 9:33 PM