सिंधुदुर्ग: जनतेच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवित आहे. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच कटिबध्द आहोत असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा मंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी झालेल्या शुभेच्छापर कार्यक्रमात मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘माझी माती- माझा देश’ हे विशेष अभियान सुरू झालेले आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नेत्यांनी पाहिलेले सु- राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपले राज्य विकासाकडे घोडदौड करत आहे याचा मला अभिमान आहे. ‘महसूल सप्ताह’ च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नागकिकांना योजनांचा लाभ घरपोच दिला आहे. विशेष म्हणजे कातकरी समाजाला जातीचे दाखले तसेच विद्यार्थ्यांना महत्वाचे प्रमाणपत्रे त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली आहेत. आपल्या जिल्ह्याचे कामकाज आता पूर्णपणे ई-ऑफिसच्या माध्यमातून असून आपला जिल्हा या प्रणालीमध्ये आघाडीवर आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. स्थानिक युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन स्थानिक स्तरावरील आपत्तीच्या प्रतिसादासाठी त्यांना सक्षम बनविणे हे याचे महत्वाचे उद्दिष्ट्य आहे. या उपक्रमांतर्गत २०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले की, शासनाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक ठरते हे सिद्ध झालेले आहे. भारतातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे. राज्यात देखील याची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने काम करत आहे. असे ही मंत्री केसरकर म्हणाले.
पुस्तकांमध्येच सरावासाठी कोरी पाने दिल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केल्याचे मोठे समाधान आहे. शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन डिझाईनचा गणवेश स्काऊट गाईडच्या गणवेशाशी साधर्म्य साधणारा असल्याने तो त्यासाठीही वापरता येणार असल्याचेही केसरकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.