सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर
By अनंत खं.जाधव | Published: November 6, 2022 08:19 PM2022-11-06T20:19:18+5:302022-11-06T20:19:28+5:30
आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार
सावंतवाडी : जोपर्यंत सरकारकडे बहुमत आहे, तो पर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालय ही विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवूनच निर्णय घेईल यांची आपणास आशा आहे. त्यामुळे अपात्र आमदाराचा निर्णय विधानसभेतच होईल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष नार्वेकर हे सावंतवाडीतील आपल्या घरी खाजगी दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके,तहसिलदार श्रीधर पाटील,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,मुख्याधिकारी जयंत जावडेकर उपस्थित होते.
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा आहे.पण या जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास झाला पाहिजे येथील किनार्यावर सोयी सुविधा निर्माण होण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.तसेच ज्या जमिनी वर्षोनुवर्षे उद्योजकांना दिल्या आहेत पण तेथे उद्योग उभारण्यात आले नाहीत या जमिनी बाबत सरकार ने कोणातरी निर्णय घेतला पाहिजे कारण सर्व सामान्य जनतेच्या जमिनी या विकास कामासाठी दिल्या आहेत मग त्या जमिनी तशाच ठेवणे योग्य नाही.त्या जमिनीवर उद्योग धंदे आले पाहिजेत असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
याबाबत मी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री याच्या उपस्थित बैठक घेणार असून,त्याबाबत ची माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना पाठवण्यास सागितली असल्याचे ही नार्वेकर यांनी सांगितले.सध्या महाराष्ट्रात सरकार लवकरच पडणार अशी चर्चा सुरू आहे.यावर ही त्यांनी भाष्य करतना जी चर्चा विधानसभा आवारात होते.ती खरी असते बाहेर कोण काय बोलतात त्याला अर्थ नसतो.असे सांगत सरकार कडे विधानसभेत जो पर्यत बहुमत आहे.तो पर्यत सरकारला कोणताही धोका नसल्याचे ही नार्वेकर यांनी सांगितले.
आमदार अपात्रे बाबत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे.त्याबाबत नार्वेकर म्हणाले आमदार अपात्रतेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात होणार नाही.तो निर्णय विधानसभेतच होईल कारण प्रत्येक व्यवस्थेने कोणते निर्णय घ्याचे हे ठरलेले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय हा न्यायालयात होणार नसल्याचा विश्वास मला आहे.असे ही नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.