दोडामार्ग : अनधिकृत खडी वाहतूक करणारा डंपर जप्त करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला असता डंपर रातोरात चोरून नेल्याची घटना घडली. चालकानेच हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करीत नायब तहसीलदार यांनी चालकाविरोधात शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.झरेबांबर येथे दुसऱ्या डंपरवर कारवाई करून तहसीलदार कार्यालयात आणतेवेळी शासकीय कर्मचाऱ्यांना न जुमानता वाटेतूनच डंपर पळवून नेल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल साटेली भेडशी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत यांनी चालकाविरोधात तक्रार नोंदविली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील काही ठिकाणी खडी उत्खननला सद्यस्थितीत स्थगिती देण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी खडी क्रशर विरोधात तळेखोलवासीयांनी उपोषण छेडले होते. त्या अनुषंगाने तालुक्यात खडी उत्खननाला स्थगिती देण्यात आली. मात्र, काळ््या दगडाची अनधिकृत वाहतूक अद्यापही सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दोडामार्ग बाजारपेठ येथे गणेश मंदिरजवळ बेकायदा खडी वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई करून डंपर तहसीलदार कार्यालयाच्या शासकीय जागेत घेऊन ठेवण्यात आला. मात्र, जप्त करण्यात आलेला डंपर रातोरात त्या शासकीय जागेतून चोरुन नेल्याची घटना घडली.
नायब तहसीलदार तसेच कर्मचारी आले असता डंपर जागी नसल्याने ही घटना उघडकीस आली. चालकांनी हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त करत नायब तहसीलदार एन. एन. देसाई यांनी चालकाविरोधात डंपर चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.अशीच कारवाई शुक्रवारी झरेबांबर येथे अनधिकृत खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर करण्यात आली. जागीच पंचनामा करून डंपर तहसीलदार कार्यालयाकडे आणत असता चालकाने शासकीय कर्मचारी कोतवाल यांना डंपरमधून वाटेतच उतरविले व शिवीगाळ करून तेथून डंपर घेऊन पसार झाला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी याही डंपर चालकाविरोधात साटेली भेडशी मंडळ अधिकारी सावंत यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावरबेकायदेशीर बेदरकारपणे खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्याबाबत पंच यादीही घातली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना न जुमानणाऱ्या डंपर चालकांनी चकवा देत थेट तहसीलदार कार्यालयातूनच रातोरात डंपर घेऊन पलायन केले. यावरून तहसीलदार कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला असून तालुक्यावर किती धाक आहे, हे स्पष्ट झाले आहे.