सिंधुदुर्गनगरी : जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्साठी ३७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांनी आराखड्यातील मंजूर कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. ती वाढवून ३१ डिसेंबर २०१८ करण्यात आली होती. तरीही कामे अपूर्ण राहिल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव सु. द. नाईक यांनी आदेश काढत हि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याचे कळविले आहे.जिल्ह्यातील ३७ गावामधील नाडण, धालवली, सौदाळे, नावळे, हरकुळ बुद्रुक, असगणी, तिरवडे, पोखरण, अणाव, सावरवाड, बांदा, कोनशी, दाभिळ, हेवाळे, आयनोडे, घाटीवडे - बांबर्डे या १५ गावांनी १०० कामे पूर्ण केली आहेत. पालांडेवाडी, नाटळ, हळवल, साळेल, कुसबे, पिंगूळी, गिरगाव, कुसगांव, नेरूर तर्फे हवेली, भंडारवाडा, सांगेली, खानयाळे, झोळंबे यांनी ८० टक्के काम पूर्ण केली आहेत. तर कळसुली, भिरवंडे, ओसरगाव, किर्लोस, कुंभारमाठ, आंजीवडे, आडेली, गवाण, चौकुळ या ९ गावांची कामे ५० टक्केच झाली आहेत.२१ फेब्रुवारी २०१९ च्या अहवालानुसार २०१७-१८ मधील जलयुक्त शिवारमध्ये समाविष्ट गावांनी ७०८ पैकी ६२१ कामे पूर्ण केली आहेत. या कामांना १० कोटी ६४ लाख पैकी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाले आहेत. आराखड्यानुसार ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट होते.
पूर्ण झालेल्या कामामुळे यातील ३१६.७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अजून ३.०५ हेक्टर ओलिताखाली येणे शिल्लक राहिले आहे. अपूर्ण राहिलेल्या ८७ कामांना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ३४ कामे प्रगतीपथावर आहेत. निर्मिती पाणीसाठा क्षमता १३०.८० टीसीएम एवढा वाढला आहे. तर यामुळे सिंचनाखाली २८.८५ हेक्टर क्षेत्र आले आहे.