कणकवली : भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे (भैरवगाव) गावचे रहिवासी जवान सदाशिव गंगाराम बाईत हे शहीद झाले होते. त्यांच्या हौतात्म्याला २१ डिसेंबर २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे यावे यासाठी त्यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे. किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाला त्यांचे नाव शासनाने द्यावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. अमर जवान सदाशिव बाईत यांचा जन्म १ जून १९४० साली झाला होता. ते आपल्या वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले. मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव येथून ते सैन्यात भरती झाले होते. देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. भारतपाकिस्तान मध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना ते शहीद झाले. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर' बॅज ऑफ सॅक्रिफाइस ' हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा या महान वीर जवानाचे कार्य नवीन पिढीसमोर यावे आणि नवीन पिढीने देश सेवेसाठी पुढे यावे अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. सदाशिव बाईत यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून व नातवंडे , पुतणे व इतर कुटुंबीय आहेत. त्यांचे सुपुत्र रवींद्र उर्फ सुभाष बाईत हे कणकवली येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सदाशिव बाईत यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांचे पुतणे सुरेश बाईत व इतर कुटुंबीय प्रयत्न करीत आहेत.
अमर जवान सदाशिव बाईत यांचे शासनाने स्मारक उभारावे!, कुटुंबियांची मागणी; १९७१ साली झालेल्या युद्धात झाले होते शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 1:19 PM