सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:30 AM2019-11-29T11:30:20+5:302019-11-29T11:31:49+5:30
वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करून जनतेला अभिप्रेत असलेले काम करून दाखवील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने देशात व महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन केली. परंतु नियतीनेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पाडून त्यांना धडा शिकवला, अशी टीकाही मसुरकर यांनी केली आहे.
देशात मोदी, शहा यांच्या भाजप सरकारने विविध पक्षातील आमदारांना आमिष दाखवून पक्ष फोडण्याचे काम केले. कुठल्याही मार्गाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु महाराष्ट्रामध्ये नियतीनेच युती तोडण्याचे काम चाणाक्षपणे केले आहे. भाजपच्या गलिच्छ राजकारणाला जागा दाखविण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना त्या काळात किडनीचा आजार असताना त्यांची भेट घेऊन त्यांना मोफत सरकारी खर्चात उपचारांकरिता अमेरिकेत पाठविले होते. त्यांच्या प्रकृतीला धक्का लागू नये म्हणून त्यांची काळजी राजीव गांधी यांनी घेतली होती. हा आदर त्या काळात पक्षभिन्नता असूनही राजीव गांधी यांच्यामध्ये दिसला. परंतु सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेली सुरक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने काढून घेतली. हा फरक भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे.
मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला होता. त्यांना नियतीनेच धडा शिकविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना ४२५ खासदार काँग्रेस सरकारचे एकहाती निवडून आले होते. परंतु त्या काळात भाजपचे दोन खासदार असताना कधी चेष्टा व अनुद्गार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी काढले नव्हते.
वाजपेयी व अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल त्यांना नेहमीच आदर होता. सत्ता आणि पैसा याचा अतिरेक कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असू नये. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या कठीण परिस्थितीत तळमळीने काम करीत असतो, असे मतही मसुरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सरकार वैचारिक मतभेद बाजूला ठेवेल
पुन्हा निवडणुका लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व आरोग्य, उद्योगधंदे, महागाई आदी प्रश्न सोडविण्यासाठी येणारे महाविकास आघाडीचे सरकार आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी याचा विचार करून सरकारला पूर्ण पाच वर्षांसाठी पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया मसुरकर यांनी व्यक्त केली.
सिंधुफोटो-राजू मसुरकर
राजू मसुरकर