लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीसह राज्यातील अन्य पाच शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे शासकीय तंत्रनिकेतनकडे होणारे प्रवेश रोडावले आहेत. तसेच खासगी संस्थांच्या कमी झालेल्या शुल्कामुळे पालकवर्ग खासगी शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. यामुळे उद्या (दि. ३०) प्रवेशाची अंतिम मुदत असली तरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यावर्षी गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी ५० टक्केही प्रवेश अर्जांची विक्री झालेली नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रत्नागिरीसह धुळे, सोलापूर, जालना, यवतमाळ आणि लातूर या सहा जिल्ह्यांतील शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि कोणताही विचार न करता घाईघाईने तसा अध्यादेशही काढला. परंतु त्यानंतर आता पुन्हा तांत्रिक बाबींमुळे यावर्षी राज्यातील ही सहाही तंत्रनिकेतन बंद करता येत नाहीत, असे जाहीर केले. त्यामुळे सहाही तंत्रनिकेतनमध्ये यावर्षी प्रथम वर्षाचे प्रवेश दरवर्षीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यानुसार रत्नागिरी तंत्रनिकेतनचे पहिल्या शिफ्टमध्ये सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर असे पाच अभ्यासक्रम तसेच दुसऱ्या शिफ्टमध्ये सिव्हील, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे तीन या सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीचे प्रवेश सुरू आहेत. तीन वर्षे मुदतीच्या या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० विद्यार्थी प्रवेशक्षमता आहे. या अभ्यासक्रमांना जिल्ह्यातील ७० टक्के, तर बाहेरच्या ३० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.सर्व अभ्यासक्रमांसाठी एकूण ४८० एवढी विद्यार्थीक्षमता आहे. १९ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पुढच्या वर्षी शासकीय तंत्रनिकेतन बंद होणार आहे, त्यामुळे या संस्थेत प्रवेश घ्यायचा की नाही, असा संभ्रम दहावी, बारावी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पालकवर्ग या संस्थेत प्रवेश घेण्यास इच्छुक दिसत नाही. त्यातच आता खासगी तंत्रनिकेतनच्या सर्व अभ्यासक्रमांचे शुल्क लक्षणीय कमी झाल्याने पालकवर्ग शासकीय तंत्रनिकेतनकडून खासगी तंत्रनिकेतनकडे वळला आहे. त्यामुळे यावर्षी खासगी संस्थांकडे अधिक प्रवेश होत असल्याचे चित्र आहे.तंत्रनिकेतनमध्ये पहिल्या वर्षासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र, पालकांमध्येच शासकीय तंत्रनिकेतनबाबत संभ्रम असल्याने दरवर्षी ४८० जागांसाठी १५०० च्या आसपास येणारे अर्ज यावर्षी घटले आहेत. यावर्षी केवळ ७०० अर्जांची विक्री झाली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा खासगी संस्थांना झाल्याने त्यांचे यावर्षीचे प्रवेश चांगले झाल्याचे काही खासगी संस्था चालकांनी लोकमतकडे बोलून दाखवले.शासकीय तंत्रनिकेतन सुरू राहणार आहे. त्यामुळे पालकवर्गाने खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेण्याऐवजी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन आजी - माजी विद्यार्थी, नागरिक समितीतर्फे करण्यात येत आहे.प्रवेश प्रक्रिया सुरु : कागदपत्रांसाठी वेळच नाहीदहावीचा निकाल लागल्यानंतर यावर्षी २४ तारखेनंतर गुणपत्रके देण्यास प्रारंभ झाला. तत्पूर्वी १९ जूनपासून तंत्रनिकेतनमधील आॅनलाईन प्रवेशाला प्रारंभ झाला आहे. ३० जून अंतिम मुदत आहे. परंतु २४, २५ आणि २६ जूनला शासकीय सुटी आल्याने गुणपत्रक मिळाले तरी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकवर्गाला पुरेसा कालावधी मिळाला नाही. सीईटी किंवा जेईई यांसारख्या परीक्षा मुलांना अवघड जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे दहावीनंतर दोन वर्षे बारावीसाठी खर्च करून पुन्हा ही परीक्षा यशस्वीरित्या देता आली नाही तर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अशक्य होणार. त्यापेक्षा दहावीनंतर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून त्यानंतर वाटले तर डिग्रीला प्रवेश घेता येईल, अशी मानसिकता मुले आणि पालक यांची झाली आहे.
सरकारचा सावळा गोंधळ खासगी संस्थांची चंगळ
By admin | Published: June 30, 2017 1:05 AM