सावंतवाडी : ‘बोला बजरंग बली की जय...’, ‘तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे, गोपाळा...’, अशा आरोळ्या देत तरुणाईच्या जल्लोषात शहरात रविवारी दहीहंडी उत्सव पार पडला. शहरातील १७ दहीहंड्या विविध पथकांनी फोडून उत्सवाचा आनंद घेतला. न्यायालयाच्या नियमांच्या चौकटीत राहून येथील दहीहंड्या फोडण्यात आल्या. येथील सालईवाडा येथील दहीहंडी फोडून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सालईवाडा हनुमान मंदिर, बाजारपेठ मित्रमंडळ, जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिरासमोरील, उभाबाजार, आरोग्यभुवन समोरील, गवळी तिठा मित्रमंडळ, भटवाडी मित्रमंडळ, माठेवाडा मित्रमंडळ, कोलगाव मित्रमंडळ, कोलगाव मित्रमंडळ, भाजी मार्केट मित्रमंडळ, मुजीब शेख मित्रमंडळ, गांधी चौक येथील दहीहंडी अशा विविध मंडळांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. या सर्व दहीहंड्या अमेय मित्रमंडळाने फोडून उत्सवाचा आनंद घेतला.गोविंदा रे गोपाळा..., बजरंगबली की जय, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा, अशा आरोळ्या देत ढोलताशांच्या गजरात तसेच साऊंड सिस्टिमच्या तालावर नाचत सर्व गोविंदांनी दहीहंड्या फोडल्या. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्याच्या कडेला, दुकानात, इमारतींच्या बाल्कनीमध्ये उभे राहून नागरिकांनी दहीहंडीचा आनंद लुटला. काहींनी गोपाळांच्या सुरक्षिततेसाठी थरांच्या अवतीभोवती सुरक्षाकडे तयार करून सतर्कता दर्शविली. शहरातील चिटणीसनाका येथील दहीहंडी गेली तीन वर्षे बंद होती. ती दहीहंंडी पुन्हा सुरू केली. त्यामुळे चिटणीस नाका परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)नियमांचे पालनन्यायालयाच्या नियमांच्या चौकटीत राहूनच शहरातील सर्व दहीहंड्या फोडण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांचाही समावेश करून घेतला नव्हता. सर्व दहीहंड्या पाच थरांपर्यंत फोडण्यात आल्या. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘गोविंदा रे गोपाळा’चा जल्लोष
By admin | Published: September 07, 2015 9:39 PM