कणकवली : ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात आणि आकर्षक मानवी मनोरे रचत मोठ्या उत्साहात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोविंदा पथकांनी रविवारी विविध ठिकाणी दहीहंडी फोडत आनंद लुटला. या निमित्ताने गोविंदा पथकांच्या उत्साहाला जणू उधाणच आले होते.रविवारी दुपारनंतर उंचच उंच मानवी मनोरे रचत अनेक गोविंदा पथकांनी ठिकठिकाणच्या दहीहंड्या फोडल्या. या निमित्ताने दहीहंडीचा थरार रसिकांना अनुभवायला मिळाला. दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. कणकवली शहरातील बाजारपेठ मित्रमंडळासह अनेक मंडळांनी दहिहंड्या बांधल्या होत्या. बांधकरवाडी, तेलीआळी, कनकनगर, गांगो मंदिर तसेच टेंबवाडी येथील श्री नागेश्वर मंदिर येथे दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. कलमठ येथेही विविध ठिकाणी हंड्या बांधल्या होत्या. दुपारी १ वाजल्यानंतर दहीहंड्या फोडण्यास सुरुवात झाली. शिरवल, हळवल, फोंडाघाट, कासार्डे, नांदगांव, कनेडी परिसरातही दहिहंड्या उभारण्यात आल्या होत्या. दहिहंड्या फोडणाऱ्या गोविंदा पथकांकडून दिवसभर पावसाची वाट बघण्यात येत होती. मात्र, पाऊस न आल्याने निराशा झाली. ग्रामीण भागातही दहीहंडी बांधून ती फोडण्याचा आनंद गोविंदा पथकांनी लुटला. मात्र, दरवर्षी दहीहंडी बांधण्यामध्ये आढळून येणारा उत्साह यावर्षी काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)नागरिकांकडून नाराजीअनेक ठिकाणी दहिहंड्यांसाठी काहीजणांकडून पैसे गोळा केले जात होते. नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर अशा दहिहंड्या बांधून अशी पथके स्वखुषीने पैसे देण्यास सांगत असली तरीही किती ठिकाणी पैसे द्यायचे अशी विचारणा करण्यात येत होती. याबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पैसे मागण्यांमुळे उत्सवाला गालबोट लागत असल्याची प्रतिक्रियाही काही नागरिकांनी व्यक्त केली.गोविंदा जखमीआंब्रड येथील ओंकार भिकाजी तेली (वय १२) हा गोविंदा हंडी फोडताना जखमी झाला. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
गोविंदा पथकाच्या उत्साहाला उधाण
By admin | Published: September 06, 2015 8:46 PM