सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायतीमध्ये डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेली ३ वर्षे मानधनच मिळाले नसल्याची बाब गुरुवारी वित्त समिती सभेत समोर आली. सदस्य गणेश राणे यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसा अहवाल पुढील सभेत सादर करा, अशा सूचना सभापती रवींद्र जठार यांनी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांना दिल्या.जिल्हा परिषद वित्त व बांधकाम समितीची मासिक तहकूब सभा गुरुवारी समिती सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी समिती सदस्य महेंद्र चव्हाण, अनघा राणे, आनंद गोसावी, संतोष साटविलकर, गणेश राणे तर बांधकाम समिती सभेला समिती सचिव बांधकाम अभियंता अनामिका जाधव, महेंद्र चव्हाण, राजेश कविटकर, श्रेया सावंत अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सुरुवातीला वित्त समिती सभा पार पडली. भाजपचे सदस्य गणेश राणे यांनी देवगडमधील काही ग्रामपंचायतींअंतर्गत काम करणाºया डाटा एंट्री आॅपरेटर यांना ३ वर्षांपासून मानधन मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब गंभीर असून, हा आॅपरेटरांवर अन्याय आहे. या कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न उपस्थित करून यांचे मानधन केव्हा जमा होणार? अशी विचारणा केली.
एवढी वर्षे मानधन न मिळूनही देवगड गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली गेली नाही. तरीही या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी लावून अहवाल पुढील बैठकीत सादर करते असे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी सभागृहात सांगितले.तर अर्ध्या तासाच्या कालावधीत नंतर लगेचच बांधकाम समिती सभा सुरू झाली. या सभेतही विशेष अशी काही चर्चा घडली नाही. एकमेव सदस्य राजेश कविटकर सभागृहात सूचना मांडत होते. परंतु त्यांच्या सूचनेला समर्पक उत्तर मिळत नव्हते. सदस्य कविटकर यांनी झाराप शाळा नादुरुस्त आहे. त्यासाठी निधी मिळावा. आकेरी शाळेच्या स्लॅबला गळती आहे.
एमआरईजीएसअंतर्गत किती विहिरी अर्धवट आहेत? माणगाव आरोग्य केंद्राचे निर्लेखन केव्हा होणार? या सूचना त्यांनी सभागृहात उपस्थित केल्या. परंतु त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळू शकली नाहीत.