सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणेंचे निकटवर्तीय आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना स्वत:च्या गावात मोठा धक्का बसला आहे. मनीष दळवी यांच्या होडावडे गावात शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवार रसिका केळुसकर विजयी झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजपा नेते मनीष दळवी यांचे गाव असलेल्या होडावड्यामध्ये अजब युती पाहायला मिळाली. शिंदे गट आणि भाजपाने सरपंचपदासाठी रसिका केळुसकर यांना उमेदवारी दिली होती. तर मनीष दळवी यांच्या गटाने पूनम नाईक यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये सरपंचपदी शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवार रसिका केळुसकर या विजयी झाल्या. तर पूनम नाईक यांना पराभूत व्हावे लागले. मात्र एकूण ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गट आणि भाजपाला केवळ दोन जागा मिळाल्या तर विरोधी गटाचे ७ उमेदवार विजयी झाले.
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि शिंदे गट आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपा ३६० तर शिंदे गट २४८ ठिकाणी विजयी झाला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८६ ठिकाणी विजयी झाले आहेत.