रत्नागिरी : ग्रामपंचायत हद्दीतील घर दुरुस्ती व नवीन घरबांधणी परवानगीचा अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. याविषयी आमदार राजन साळवी यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.गावातील घर दुरुस्ती व घर बांधणी परवानगीकामी अधिक पारदर्शकता यावी, परवानगी मिळवणे सहजशक्य व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने ग्रामपंचायत हद्दीतील याबाबतच्या परवागनीचे अधिकार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग केले होते. परंतु ग्रामीण भागातील अशिक्षित व गोरगरीब ग्रामस्थांना रोजंदारीची दैनंदिन कामे सोडून यासाठी शहराच्या वा तालुक्याच्या ठिकाणी पैसा व वेळ घालवून यावे लागत होते. गेल्या वर्षभरापासून गावातील घर दुरुस्ती व घर बांधणीचे प्रस्ताव तसेच पडून राहिल्याने ग्रामस्थांची मोठी कुचंबणा होऊन त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या.या पार्श्वभूमीवर कोकणातील अशिक्षित व गोरगरीब ग्रामस्थ मंडळींचे शासनाच्या या निर्णयामुळे होत असलेली कुचंबणा व स्थानिक लोकप्रतिनिधींची यामुळे होत असलेली अडचण आदी सर्व बाबींचा विचार करून कोकणातील मूलभूत समस्यांप्रती नेहमी सतर्क असणारे विधानसभेतील कोकणचे शिवसेना पक्षप्रतोद राजन साळवी यांनी राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. (प्रतिनिधी)
घर बांधणी, दुरुस्तीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीला
By admin | Published: March 22, 2016 11:41 PM