खारेपाटण : महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरूद्ध व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ तसेच विविध समस्यांबाबत खारेपाटण-चिंचवली व नडगिवे ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खारेपाटण विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली येथील शाखा अभियंता कार्यालयाला घेराओ घालण्यात आला.यावेळी चिंचवली सरपंच अनिल पेडणेकर, नडगिवे सरपंच विलास करंगुटकर, नडगिवे माजी सरपंच राजेश वारंग, काँग्रेसचे कणकवली तालुका कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भालेकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई, मोहन पगारे, अण्णा भालेकर, संदीप भालेकर, राजेंद्र भालेकर, सचिन शिंदे, राजेंद्र राऊत, शिवाजी राऊत, मनोहर पाटील, मिलिंद खडपे, महादेव मण्यार आदी ग्रामस्थ व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच खारेपाटण येथे रात्री अपरात्री केव्हाही वीज पुरवठा खंडित केला जातो. जीर्ण झालेले खांब बदलण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी खांब उभे केले आहेत. मात्र, त्याच्यावर लाईन ओढलेली नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी तर जुने सडलेले खांब कट करून पुन्हा वापरण्यात आले असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी केला. या कारभारात महावितरण कंपनीने सुधारणा करावी, अन्यथा आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिले.हसोळटेंब - कोंडवाडीला कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो. या लाईनवरून इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीला विद्युत पुरवठा केला जाणार आहे. याला ग्रामस्थांनी हरकत घेत प्रथम आम्हाला जास्त दाबाने विद्युत पुरवठा करा व नंतरच शाळेला विद्युत पुरवठा करा अन्यथा चालू असलेले काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला. (वार्ताहर)बदली रद्द करेपर्यंत गप्प बसणार नाहीचिंचवली व नडगिवे या गावांसाठी स्वतंत्र विद्युत कर्मचारी नेमलेला असताना हा कर्मचारी साईनाथ कांबळे याची तडकाफडकी बदली केल्यामुळे येथील शाखा अभियंता व्ही. एस. माळी यांना घेराओ घालून जाब विचारण्यात आला. विद्युत कर्मचारी कांबळे यांची विनंती बदली नाकारण्यात आली. मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली चिपळूण येथे करण्यात आल्याचे वीज कंपनीकडून कळविण्यात आले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत कांबळे यांची बदली रद्द केली जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही व दुसऱ्या कर्मचाऱ्याला येथे हजर करून घेणार नाही. तरी त्यांची तडकाफडकी बदली रद्द करण्यात यावी अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे खारेपाटण सहाय्यक अभियंता माळी यांच्याकडे करण्यात आली. खारेपाटण शाखा अभियंता माळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ही बाब लक्षात आणून देईन. प्राधान्याने येथील लोकांच्या समस्या सोडविण्यास मदत करेन असे सांगितले.आंदोलन छेडण्याचा इशारायेत्या १५ दिवसांत रत्नागिरीचे मुख्य अभियंता यांनी खारेपाटणला भेट न दिल्यास १० गावांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल व महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्ते रमाकांत राऊत व सूर्यकांत भालेकर यांनी दिला. महावितरण कंपनीने आपल्या कामाता सुधारणा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वीज अभियंता कार्यालयाला ग्रामस्थांचा घेराओ
By admin | Published: June 17, 2015 10:13 PM