बांदा : बांदा येथील ग्रामसेवक निवासस्थानाच्या इमारतीची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. इमारतीचे छप्पर पूर्णपणे कोसळले आहे. ही इमारत जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून जागा देवस्थान समितीच्या नावे आहे. मात्र, इमारत दुरुस्ती निधीसाठी सदरची जागा ही जिल्हा परिषदेच्या नावे करावी, असे आडमुठे धोरण जिल्हा परिषदेने अवलंबिल्याने या इमारतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. इमारतीची दोन गुंठे जागा ही बांदेश्वर देवस्थान समितीच्या नावे आहे. जिल्हा परिषदेने या जमिनीवर इमारतीचे बांधकाम केले. बांदा ग्रामसेवकासाठी निवासस्थान म्हणून या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला. २३ जानेवारी २00२ रोजी जिल्हा परिषदेने या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १ लाख पाच हजार रुपये खर्ची घातले. त्यानंतर अद्यापपर्यत १२ वर्षे या इमारतीसाठी एक रुपया देखील खर्च करण्यात न आल्याने या इमारतीचे छप्पर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. तसेच इमारतीच्या भिंतीना तडे गेल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. बांदा ग्रामपंचायतीने या इमारतीच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. ४ मार्च २00१ रोजी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पाठविलेल्या पत्रात म्हटले की, सदरच्या इमारतीची जागा ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करुन द्यावी. मात्र, देवस्थान समितीने याला नकार दिल्याने जमीनवादात ही इमारत सापडली आहे. गेली कित्येक वर्षे ही इमारत वापराविना पडून आहे. देखभाल दुरुस्तीअभावी इमारत मोडकळीस आल्याने ग्रामसेवकांनी इतर ठिकाणी राहणे पसंत केले. इमारतीचे छप्पर, दरवाजे, खिडक्या या पूर्णपणे जिर्ण झाल्याने मोडलेल्या स्थितीत आहे. तसेच पावसाच्या पाण्यात भिजल्याने भिंतीनादेखील तडे गेले आहेत. तत्पुर्वी २0१0 साली या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १ लाख ३१ हजार ५४८ रुपये किमतीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेने मंजूर केले होते. मात्र, जागा नावावर न झाल्याने जिल्हा परिषदेने या इमारतीच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केली. पावसाळ्यात ही इमारत पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)
ग्रामसेवक निवासस्थानाची दुरवस्था
By admin | Published: July 06, 2014 12:27 AM