वैभववाडी : आखवणे-भोम ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणातील तीन ग्रामसेवकांपैकी डी. बी. कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी निलंबित केले आहे, तर काही महिन्यांपासून बेपत्ता असलेले एस. टी. कस्तुरे यांची विभागीय चौकशी सुरू झाली असून, डी. एम. सावंत यांनी कारवाई टाळण्यासाठी राजीनामा दिला आहे. आखवणे भोम ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीसह पर्यावरण संतुलित योजनेच्या निधीत सुमारे चार लाखांचा अपहार कांबळे, कस्तुरे व सावंत या तिघांच्या कारकिर्दीत झाला होता. त्यामुळे या तिन्ही ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी, यासाठी पंचायत समितीचे सदस्य नासीर काझी यांनी मासिक सभेत वारंवार मागणी करूनही जिल्हास्तरावरून गेले आठ महिने कारवाईला टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे ३ डिसेंबरला आयोजित केलेली पंचायत समितीची मासिक सभा जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांची सोमवारी भेट घेतली होती. अपहाराचा ठपका ठेवलेल्या तिन्ही वादग्रस्त ग्रामसेवकांवर कारवाईबाबत पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी कांबळे यांना निलंबित केले आहे. त्याचप्रमाणे एस. टी. कस्तुरे यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे, तर निवृत्ती जवळ आल्याने कारवाई टाळण्यासाठी डी. एम. सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले अपहार प्रकरण मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)
आखवणे अपहारप्रकरणी ग्रामसेवक कांबळे निलंबित
By admin | Published: December 20, 2015 12:41 AM