दापोली : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण - २०१०अंतर्गत ‘ग्रंथोत्सव २०१५’ हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या, ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांमार्फत जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांमधील, वाचन, संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथ महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. शासन पातळीवरील प्रयत्नांचा भाग म्हणून प्रतिवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ग्रंथोत्सव जोपासना अभियानाअंतर्गत ‘ग्रंथोत्सव-२०१५’ हा उपक्रम राज्यातील जिल्ह्यांच्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. हे उपक्रम राबवण्यासाठी सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेला निधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सचिव यांना वितरित करण्यास या शासनाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी ग्रंथोत्सव हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी तसेच सर्व शासकीय मुद्रणालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच ‘ग्रंथोत्सव-२०१५’च्या आयोजनाच्या खर्चाचा तपशील सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी ग्रंथोत्सव झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांना सादर करावा, असे परित्रकात नमूद करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरणार आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला यामुळे पुस्तके उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
राज्यात नवीन वर्षात रंगणार ग्रंथोत्सव
By admin | Published: December 06, 2015 11:12 PM