सिंधुदुर्गनगरी- गेल्या काही वर्षांपासून राज्यात शासकीय अनुदानासाठी रखडलेल्या सुमारे 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने 2 हजार 907 शाळा व 4 हजार 319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, या निर्णयाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार व पदवीधर मतदारसंघातील आमदारांची बैठक झाली. त्यात आमदारांकडून शिक्षकांची बाजू मांडण्यात आली. अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या बैठकीनंतर विधान परिषदेत शिक्षण मंत्री तावडे यांनी अनुदानाची घोषणा केली. या घोषणेचा राज्यातील 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होईल. या संदर्भात दोन महिन्यांत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
अघोषित 403 प्राथमिक शाळा व 1829 तुकड्या, 560 अघोषित उच्च माध्यमिक शाळा, कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यानंतर पात्र होणाऱ्या 193 उच्च माध्यमिक शाळा, घोषित उच्च माध्यमिक शाळांच्या 15 तुकड्या, घोषित उच्च माध्यमिक 123 शाळा व 23 शाळांच्या अतिरिक्त तुकड्या, 19 सप्टेंबर 2016 अन्वये 20 टक्के अनुदानप्राप्त 1628 शाळा व 2452 तुकड्यांना पुढील 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे 2907 शाळा व 4319 तुकड्यांना अनुदान मिळणार असून, 23 हजार 807 शिक्षक व 5 हजार 352 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या अनुदानासाठी सरकारकडून 275 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली. या संदर्भात विधान परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले आहेत.