सावंतवाडी : वाढत्या तापमानाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात जीव सृष्टीवर होत असून, पक्षांचा आहार हा वनस्पतींवर अवलंबून असल्याने त्याचा परिणाम हा साहजिकच किटकांना जाणवत असतो. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट पक्ष्यांसमोर उभे असून, त्याचा एकत्रित सामना करणे गरजेचे असल्याचे मत २९ व्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे यांनी उद्घाटन कार्यक्रमात मांडले. दोन दिवस चालणाऱ्या २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला शनिवारपासून सावंतवाडीत सुरूवात झाली असून, त्याचे उद्घाटन राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, माजी अध्यक्ष उल्हास राणे, सुधाकर कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात शरद आपटे म्हणाले, १९९० सालापासून मी पक्षी निरीक्षक म्हणून काम सुरू केले. जेव्हा जेव्हा निरीक्षणास जात असे, तेव्हा तेथील माहिती, ठिकाण वहीत लिहून ठेवत असे. त्यामुळे त्यांचे आकलन करण्यास सोपे जात होते. पक्ष्यांच्या आवाजाची जाण ही प्रत्येकाला असते. पण ते प्रत्यक्षात कृतीत आणत नाहीत. थोर वन्यजीव छायाचित्रकार टी. एन. ए. पेरूमल यांनी मला आवाजाचे ध्वनी मुद्रण करा, असे सुचवले. त्यामुळेच १९९६ पासून हे काम हाती घेतले. त्यांच्यामुळेच मला या विषयात रूची निर्माण झाली, असे यावेळी आपटे म्हणाले पश्चिम घाटामध्ये अनेक पक्षी आहेत. पण त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असून, १८ वर्षांच्या प्रयत्नातून पश्चिम घाटातील पक्षाचे आवाज गोळा केले. २०१७ मध्ये या ध्वनीमुद्रितेचे प्रकाशन होणार असून, आवाजाचे भाग कोणते व किती याची माहितीही मी गोळा केली आहे. यापूर्वी ९० पक्ष्यांची ओळख राज्याला तसेच पक्षीमित्रांना करून दिली. त्यांचे आवाजाचे नमुनेही ध्वनीमुद्रित केले असल्याचे यावेळी आपटे यांनी स्पष्ट केले. नवोदितांना पक्षीमित्र म्हणून काम करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा, असे सांगत असतानाच युवा पिढी निरीक्षणापेक्षा फोटो काढण्यावरच भर देतात, अशी खंत व्यक्त करीत यासाठी ते काहीही करतात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उदाहरणही दिले. एखाद्या घरट्याचा फोटो काढत असताना त्यांनी त्या घरट्याला धोका उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी युवा पिढीला केले. तसेच सर्वच पक्ष्यांचे फोटो काढले की ते ओळखायला येतातच असे नाही, असेही आपटे म्हणाले. महापक्षी गणनेचे खरे रूप बाहेर येत नाही. अनेक वेळा महापक्षी गणना अहवाल शंभर वर येतात. तर कधी १५ वर येतात. यावर संमेलनातून संवाद होणे गरजेचे आहे. मात्र, हे होत असतानाच ग्लोबल वॉर्मिंग एक संकट असून, त्याचा सर्वानी एकत्रित अभ्यास करून होणारा परिणाम सर्वांसमोर मांडावा. कारण पक्षी वनस्पतीवर बसत असतात आणि वनस्पतींवर किटक असतात. जर पक्ष्यांना किटकच नसतील, तर ते जगणार कसे, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. पक्षीमित्रासह सरकारनेही विचार करण्याची गरज असून, यावर संवाद व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी सांगितले की, संस्थानकांनी नेहमीच वनसंवर्धनाला महत्त्व दिले असून, बडोदा राजघराण्याचे फत्तेसिंह गायकवाड यांनी तर देशाच्या वनसंवर्धन महामंडाळावर काम केले आहे. त्यांनी देशाबाहेर इंग्लंडमध्ये या विषयावर अभ्यास केल्याचे सांगितले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अध्यक्ष भाऊ काटघरे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे उद्घाटन राजमातांच्या हस्ते झाले. उपस्थितांचे स्वागत व ओळख प्रा. गणेश मर्गज यांनी करून दिली. तर प्रास्ताविक प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. पक्षीमित्र संमेलनाला राज्यातून पक्षीमित्र उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे संकट
By admin | Published: January 23, 2016 11:05 PM