कुडाळ : राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धोकादायक बनलेल्या ‘हत्ती हटाव’बाबतच्या प्रस्तावाला दिल्ली येथे झालेल्या केंद्रस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठ - दहा दिवसांत प्रत्यक्ष हत्ती हटाव मोहिमेस प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथे पत्रकारांना दिली. गेली दहा वर्षे कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या हत्तींनी आतापर्यंत अकरा जणांचा बळी घेतला. अनेकांना जखमी केले. अनेक शेतकऱ्यांच्या शेती-बागायतींचे करोडो रुपयांचे नुकसान केले. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील जनता भीतीच्या छायेखाली जगत असून, शासनाने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.खासदार विनायक राऊत यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष देत हत्तींना हटविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून या जिल्ह्यातील हत्ती हटविण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवन येथे केंद्रीय वन विभाग, तसेच राज्य वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार विनायक राऊत यांच्यासह खासदार अनंत महाडिक, केंद्रीय वनविभागाचे विभागीय संचालक एस. एस. गर्भपाल, वन विभागाचे महासंचालक आर. के. श्रीवास्तव, विनोद राजन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पर्यावरण मंत्र्यांचाग्रीन सिग्नल : राऊतरानटी हत्तींच्या जिल्ह्यातील प्रश्नाबाबत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून हत्ती हटाव प्रस्ताव व मोहिमेला ग्रीन सिग्नल दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हत्ती हटाव मोहिमेस लवकरात लवकर प्रारंभ झाल्यास जनतेची या त्रासापासून कायमची मुक्तता होईल.
‘हत्ती हटाव’ला ग्रीन सिग्नल
By admin | Published: December 04, 2014 10:26 PM