मालवण : मालवण तालुक्यातील कुणकवळे, कर्लाचाव्हाळ, चुनवरे, चिंदर या चार गावात जलयुक्त शिवार योजनेखाली कामे सुरु आहेत. त्यातील सिमेंट नाला बंधारे उभारणीचे काम बाकी आहे. मात्र, कर्लाचाव्हाळ व कुणकवळे गावात सिमेंट नाला बंधारे उभारणीसाठी सिंधुदुर्ग भूजल सर्वेक्षण विभागाने परवानगी नाकारली आहे. बंधारे उभारणीची जागा योग्य नसल्याचा अहवाल संबंधित विभागाने दिला असल्याने दोन गावात बंधारा उभारणीची कामे रखडली आहे. दरम्यान, गावातील ग्रामस्थांनी या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदविताना न्यायासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. मालवण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेखाली चार गावांची निवड करण्यात आली. चार गावात योजनेची २२ कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात पूर्ण झाली असून ५७ बंधारे बांधण्यात आले आहेत. याकामी ५६ लाख ९७ हजार रुपये खर्चही झाल्याचे तालुका कृषी विभागाने स्पष्ट केले. जलयुक्त शिवारमध्ये निवडण्यात आलेल्या गावात मिळून २५ ते २६ लाखाची नवी कामे अपेक्षित आहेत, असे तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. करंजे यांनी स्पष्ट केले होते. (प्रतिनिधी)बंधारे : सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण विभागाने गावातून सिमेंट नाला बंधाऱ्यासाठी ज्या जागा निवडण्यात आल्या त्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले. यावेळी कर्लाचाव्हाळ आणि कुणकवळे या गावातील जागा पाणी साठवणुकीस योग्य नसल्याचा अहवाल दिला आहे. बंधाऱ्यात पाणी साचून राहण्यापेक्षा जमा झालेले पाणी झिरपून परिसरातील विहीर व अन्य जलस्त्रोताची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागेवर बंधारे व्हावेत. यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येईल, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
‘भूजल’ने परवानगी नाकारली
By admin | Published: December 07, 2015 11:26 PM