कणकवली : नागवे गावातील अक्षय सखाराम घाडीगांवकर (२२, रा़ गावकरवाडी) या युवकाला सोमवारी सकाळी ढवणदुकान (सांगवेकरवाडी) येथे १५ ते २० जणांच्या टोळक्याने मारहाण केली. या मारहाणीत अक्षय जखमी झाला आहे. दरम्यान रविवारी पंचक्रोशीत क्रिकेटचे सामने झाले होते. त्या ठिकाणी वाद झाला होता. त्यातूनच ही मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
मात्र, याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अक्षय घाडीगांवकर व त्याचे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी सामना खेळत असताना वाद झाला होता. त्या वादाचे पडसाद म्हणून आपल्याला सोमवारी पहाटे कामावर जात असताना अज्ञाताने ढवणदुकान येथे अडवून लाकडी दांडे व सळ्यांचा वापर करून मारहाण केली. संबंधित १५ ते २० युवक हे तोंडाला रूमाल बांधून आले होते. त्यामुळे ओळख सांगणे कठीण आहे. मी ट्रॅक्टर चालविण्यासाठी जात असताना आपल्यावर अज्ञातानी हल्ला केला आहे, असे अक्षय याचे म्हणणे आहे. या संदर्भात अक्षयच्या सांगण्यावरून कणकवली पोलिसांनी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.