सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग नगरपंचायतीसाठी शुक्रवारी शिवसेना व भाजप यांनी राजकीयदृष्ट्या सावध भूमिका घेत आपल्या प्रत्येकी पाच सदस्य गटाची स्थापना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासमोर केली. त्यामुुळे उमेदवार फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. नवनिर्वाचित दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये १७ जागांपैकी शिवसेना ५, भाजप ५, काँगे्रस ४, राष्ट्रवादी २ व मनसे १ असे उमेदवार निवडून आले आहेत. सतरा जागांपैकी दोन तृतीयांश संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच सत्ता स्थापनेसाठी फ ोडाफोडीचे राजकारण होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. यातूनच आज शिवसेनेच्या पाच सदस्यीय गटाची स्थापना करण्यात आली. या गटामध्ये गटनेते म्हणून संतोष विश्राम म्हावळंकर, संध्या राजेश प्रसादी, दिवाकर लवू गवस, लीना महादेव कुबल व सुषमा लवू मिरकर यांचा समावेश आहे. यावेळी दोडामार्गचे शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, गणेश गवस, अॅड. भूषण कुबल, लवू मिरकर, महादेव कुबल आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपानेही सावध पवित्रा घेत पाच सदस्यीय गटाची स्थापना केली. यामध्ये गटनेता म्हणून चेतन सुभाष चव्हाण, वैष्णवी विष्णू रेडकर, प्रमोद बाबू कोळेकर, रेश्मा उद्देश कोरगावकर व सुधीर सुरेश पनवेलकर यांचा समावेश आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. या दोन्ही गटस्थापनेमुळे शिवसेना व भाजप युतीची सत्ता दोडामार्ग नगरपंचायतीवर होईल, अशी जवळजवळ खात्री झाली आहे. सध्याची फोडाफोडीच्या राजकारणाची परिस्थिती पाहता त्यांनी घेतलेला हा सावध पवित्रा समजूतदार राजकारण दाखवतो. याच नगरपंचायतीत काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या दोघांची आघाडी झाली, तरी अपेक्षित संख्याबळ ते आता मिळवू शकत नाहीत. मनसेचा एक नगरसेवक जरी आघाडीने मिळविला, तरी त्यांचे संख्याबळ सातवरच थांबते. त्यामुळे दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेना व भाजप पक्षाची युतीची सत्ता येणार, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
दोडामार्गात युतीच्या सदस्यांनी केला गट
By admin | Published: November 06, 2015 11:00 PM