सिंधुदुर्गनगरी : कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा नगरसेवकांमध्ये फोडाफोडीचे राजकारण होऊ नये याची दक्षता घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेतली. तसेच शिष्टमंडळाने काँग्रेस पक्षांतर्गत निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांचा ‘कुडाळ शहर विकास’ नावाचा गट स्थापन केला असून, गटनेते म्हणून ओमकार सुधीर तेली यांची नियुक्ती केली आहे.कुडाळ नगरपंचायतीसाठी १७ एप्रिलला मतदान, तर १८ एप्रिलला मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर झाला होता. १७ पैकी ९ जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले, तर उर्वरित सहा जागांवर शिवसेना, एका जागेवर भाजप व एका जागेवर अपक्ष पॅनेलच्या नगरसेवकांना समाधान मानावे लागले होते. काँग्रेसने नऊ जागांवर निर्विवाद यश मिळवित कुडाळ नगरपंचायतीवर आपली सत्ता स्थापन केली होती.नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की, नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येतो. असे प्रकार सिंधुदुर्गात कित्येकवेळा घडले आहेत. याची खबरदारी म्हणून शनिवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेतली व नऊ नगरसेवकांचा कुडाळ शहर विकास नावाचा एक गट स्थापन केला. गटनेते म्हणून ओमकार तेली, सदस्य म्हणून विनायक राणे, सुनील बांदेकर, आबा धडाम, साक्षी सावंत, संध्या तेरसे, सायली मांजरेकर, अश्विनी गावडे, सरोज जाधव या नगरसेवकांचा गटात समावेश आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास कुडाळकर, रूपेश पावसकर, अशोक सावंत, सुनील भोगटे, दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, मंदार शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांचा गट स्थापन
By admin | Published: May 01, 2016 12:37 AM