बांदा : गतवर्षी दोडामार्ग आणि आता बांदा परिसरात माकडतापाने थैमान घातले असून यावर ठोस उपाययोजना करण्याचे सोडून पालकमंत्री दीपक केसरकर हे आढावा बैठका कसल्या घेतात? माणसे मरत असताना त्यांना मदत करायची सोडून कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचकच नसल्याची टिका आमदार नीतेश राणे यांनी बांदा येथे केली. पालकत्व म्हणजे काय असते हे पालकमंत्र्यांना माहितीच नसल्याने त्यांनी ते प्रमोद कामत यांच्याकडून शिकावे असा टोलाही राणे यांनी लगाविला.बांदा येथे माकडतापाने थैमान घातले असून आतापर्यंत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जोखीमग्रस्त भागातील २ जणांचा तापसरीने मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत माकडतापाने बाधित रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यशासन, पालकमंत्री दीपक केसरकर व प्रशासनावर रोष व्यक्त केला. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष मनिष दळवी, बांदा विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, शहर अध्यक्ष जावेद खतीब, संदेश भोगले, गजानन गायतोंडे, प्रविण देसाई, मधुकर देसाई, गुरुनाथ सावंत, अक्रम खान, नाना सावंत, उदय धुरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होेते. आमदार नीतेश राणे म्हणाले, यापूर्वी जिल्हयात मृत माकडे आढळली नव्हती. गोवा व कर्नाटक राज्यातील मृत झालेली व मरणासन्न स्थितीत असलेली माकडे ही आपल्या सीमावर्ती भागात आणून सोडल्याने या रोगाचा फैलाव झाला आहे, याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. मात्र ती जिल्हयाच्या प्रशासनाकडे, वनविभागाकडे किंवा पालकमंत्र्यांकडे कशी नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. (प्रतिनिधी)मृतांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न : नाईकमाकडताप साथीच्या पार्श्वभूमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आरोग्य खात्याकडून आढावा घेत हलगर्जीपणा न करण्याबाबत आरोग्य व वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या अधिवेशनात माकडतापाने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले. यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी आमदार नाईक यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपतालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, भाऊ वाळके, अर्चना पांगम, सुशांत पांगम, मगो सावंत, राकेश वाळके, पांडुरंग नाटेकर, उल्हास परब आदि उपस्थित होते.
प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचक नाही
By admin | Published: March 14, 2017 10:57 PM