कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेची खोट्या घोषणा करून आतापर्यंत फसवणूक केली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निविदा प्रक्रिया होऊनही निधी देण्यामध्ये सातत्याने टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनेने जाहीर केलेल्या पालकमंत्री घेराव आंदोलनात मनसे ठिकठिकाणी सक्रिय सहभाग घेणार आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी अनेकदा निधीची घोषणा केली.
स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी देण्यामध्ये वेळ आणि निधीची आकडेवारी जाहीर करूनही पालकमंत्री आता दुर्लक्ष करीत आहेत. जनतेबरोबर खोटे बोलतानाच पत्रकारांशीही खोटे बोलून स्मारकासाठी निधी न देता त्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले आहे.पालकमंत्र्यांनी १२ डिसेंबरपासून चिपी विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा विमान उतरणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार माल्टा कंपनीशी करार झाल्याची खोटी बतावणी करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी यावेळी केला़