सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतच त्यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने घेण्यात आला आहे.सभागृहाची कोणतीही परवानगी न घेता आज सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेले मोनोरेलचे उद्घाटन हे सभागृहाचा व नगराध्यक्षाचा अपमान करणारे आहे, असा आरोप करीत पालिका सभेत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी केसरकर यांच्या निषेधाचा ठराव नगरसेवक राजू बेग व परिमल नाईक यांनी मांडला. याला माजी उपनगराध्यक्ष अनारोजीन लोबो यांनी विरोध केला. परंतु अखेर मतदान घेऊन त्यांच्या विरोधात नऊ विरुद्ध सहा मतानी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध ठराव घेण्यात आला. यावेळी लोबो यांनी आपल्या सहकारी नगरसेवक घेऊन सभात्याग केला.पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीतील नगरपालिकेची प्रॉपर्टी आपली प्रॉपर्टी असल्यासारखे वागत आहेत,असा आरोप अँड. परिमल नाईक यांनी केला. काही झाले तरी आपण हा प्रकार खपवून घेणार नाही, असे राजू बेग यांनी सांगितले. तर नगराध्यक्षाना विश्वासात न घेता करण्यात येणारे उद्घाटन हा शहरासह नागरिकांचा अपमान आहे. असा आरोप अन्नपूर्णा कोरगावकर जयेद्र परुळेकर यांनी केला. त्यानंतर ही उदघाटने रद्द करण्यात आली,असे विरोधकांकडुन सांगण्यात आले.
या विषयाला भाजपाचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी वाट करून दिली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर उपस्थित होते.