कणकवली : जिल्हा नियोजन बैठकीच्या इतिवृत्तावर सही करायला पालकमंत्री दीपक केसरकर यांना वेळ नाही. तेच केसरकर आपल्या वचनपूर्ती अहवालातूनही जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेतून केली. उपरकर म्हणाले की, शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त पालकमंत्री केसरकर यांनी प्रसिद्ध केलेला वचनपूर्ती अहवाल म्हणजे फसव्या पालकमंत्र्यांचा फसवा अहवाल आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून १२५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे म्हटले असून, हा संशोधनाचा विषय आहे. प्रसिद्धी माध्यमातून रस्ते, पुलांसाठी १०० कोटी रुपये आणल्याचे केसरकर सांगत असले, तरी माहितीच्या अधिकारात अशी कोणतीही तरतूद झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिलारी धरणग्रस्तांसाठी १२ कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान दिल्याचे केसरकर आपल्या अहवालातून सांगत असले, तरी हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अद्याप धरणग्रस्त वनटाईम सेटलमेंटप्रश्नी उपोषण करीत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांतून झालेल्या सावंतवाडी टर्मिनसचे श्रेय केसरकर आपल्या खात्यावर टाकीत आहेत. केंद्राचा प्रकल्प असलेल्या हत्ती पकड मोहिमेसाठी ३८ लाखांचा खर्च झाला. त्या मोहिमेत प्रत्यक्षात तीन हत्ती मरण पावले. या निधीत मोठा भ्रष्टाचार आहे. पर्यटनासाठी कोट्यवधी रुपये आणणार असल्याचे केसरकर सांगतात. प्रत्यक्षात ५० लाखांपैकी ३७ लाख रुपये एकट्या ‘कॉफीटेबल बुक’वर खर्च झाले. आठ लाख रुपये फक्त पर्यटनाच्या अहवालावर खर्च झाले आहेत. कॉफीटेबल बुकमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. चिपी विमानतळ ते गोवा विमानतळ या मार्गासाठी १७८ कोटी प्रस्तावित असल्याचे अहवालात सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. आरोग्य सुविधांसाठी २३ कोटीची तरतूद असताना आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी दोन वेळा केली. मात्र, रुग्णांचे हाल अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)पालकमंत्री वागतात पाहुण्यांसारखेजिल्ह्याचे पालकमंत्री स्वत:च्या जिल्ह्यातच पाहुण्यांसारखे वागतात. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांबद्दलही त्यांना आस्था नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच पोलीस स्थानकाविरोधात शिवसैनिकांना उपोषणाला बसावे लागते. सत्तेत असल्याचे समाधानही कार्यकर्त्यांना मिळत नसल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने अधिकारी जिल्ह्याला लुटत आहेत, अशी टीका उपरकर यांनी केली.हत्ती मोहिमेच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.
पालकमंत्र्यांना इतिवृत्तावर सहीला वेळ नाही
By admin | Published: December 04, 2015 11:41 PM