खारेपाटण : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. येथील कोविड लसीकरण केंद्राची पाहणी करणार आहेत.सध्या राज्यसह संपूर्ण देशभर कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.अपुरा कर्मचारी वर्ग, कोविड लसीचा जिल्ह्यात असलेला तुटवडा, कोविड लसीकरण केंद्रावर नागरिकांची वाढत जाणारी गर्दी, योग्य नियोजनाचा अभाव आदी प्रमुख मुद्यांवर पालकमंत्री सामंत नेमकी काय भूमिका घेणार आहेत किंवा प्रशासनाला काय आदेश देणार आहेत, याकडे लक्ष लागून राहिले आहे.खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग हेही उपस्थित राहणार आहेत.खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले ऐतिहासिक व शहरीकरणाकडे वाटचाल करणारे अतिशय महत्त्वाचे शहर असून, भविष्यातील नवनिर्वाचित खारेपाटण तालुका निर्मितीचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे येथे असणाऱ्या खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची रोज वाढत जाणारी बाह्य व आंतर रुणाची संख्या लक्षात घेता, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी खारेपाटणवासीयांकडून सातत्याने केली जात आहे.
याबरोबरच येथे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग तातडीने भरण्यात यावा. १०८ रुग्णवाहिका खारेपाटण येथे २४ तास कार्यरत ठेवण्यात यावी आदी मागण्याही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, तरी या मागणीकडे मंत्र्यांनी लक्ष देऊन पाठ पुरावा करावा. हीच खारेपाटण दशक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे.