कणकवली : सिंधुदुर्गात नऊ महिन्यांपूर्वीच कोरोना चाचणी प्रयोगशाळेची मशिनरी आली आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याची जुळवाजुळव करून कोविड चाचणी प्रयोगशाळा लगेचच सुरू करता आली असती. तसेच कोरोनामुळे देवगडच्या महिलेचा बळीदेखील गेला नसता.
त्यामुळे या कोरोना बळीची जबाबदारी विनाकारण राजकारण करीत बसलेल्या पालकमंत्र्यांनी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये , नगरसेवक शिशिर परुळेकर, अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.
प्रमोद जठार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली असती तर चाकरमान्यांची तातडीने चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देता आला असता. यात कोरोना बाधितांचीही संख्या मर्यादित राहिली असती. मात्र, सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी राजकारण करून इथल्या जनतेला मरणाच्या दारात आणून उभे केले आहे. कोरोना चाचणीसाठी असणारी मशिनरी जिल्हा रुग्णालयात आहे हे त्यांना माहीत होते. पण ते टोलवाटोलवी करीत राहिले. यामुळे देवगड तालुक्यातील मृत झालेल्या त्या महिलेचा स्वॅब चाचणी अहवाल आठ दिवसांनी पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत तिच्या संपर्कातील अनेकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या अन्य भागातही अशीच परिस्थिती आहे. कोरोनाचे चाचणी अहवाल येण्यास चार ते आठ दिवस लागतात. तोपर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात अनेक जण येतात. श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा आज सिंधुदुर्गातील जनतेचे जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पण पालकमंत्री कोरोना चाचणी मशिन सुरू करण्याऐवजी रत्नागिरीत विद्युतदाहिनी उभी करण्यात गुंतले आहेत. ते काम एवढे महत्त्वाचे आहे का? सामंत केवळ नावापुरतेच पालकमंत्री आहेत.
आमदार वैभव नाईक यांनी कोरोना चाचणीसाठीच्या प्रयोगशाळेच्या मंजुरीचे पत्र आणले. त्यांचे मी अभिनंदन करतो. पण त्यामुळे सामंत हे उपरे असल्याचे सिद्ध झाले आहे.कामाला लागा, अन्यथा गुन्हे दाखल करू पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये ही प्रयोगशाळा उभारायची नसेल उभारू नका. तुम्हांला वाटेल तिथे उभारा . मात्र, कामाला तत्काळ सुरवात करा. जनतेचे प्राण वाचवा. अन्यथा जनतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करू, असेही यावेळी प्रमोद जठार म्हणाले.