चिपळूण : मुंबईतील मालाड - मालवणी येथे विषारी दारु पिऊन १०४ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सिमांतिनी महिला संघ, चिपळूणच्या शिष्टमंडळाने आज (सोमवारी) पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांची भेट घेतली. गावठी दारु बंद करण्याची मागणी करण्यात आली. दारुच्या व्यसनात शहरी व ग्रामीण भागातील माणूस अडकल्याने अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशी खंत या महिलांनी व्यक्त केली. यावेळी सीमांतिनी महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती साळवी, उपाध्यक्ष वसुधा पाकटे, सचिव मानसी भोसले, कार्याध्यक्ष दीपाली महाडिक, श्यामल कदम, मेघा साळवी, मंजूषा साळवी, वसुधा पाकळे, नम्रता साळवी, प्रजक्ता केळस्कर, शुभांगी पालशेतकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. शासन व प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोस गावठी दारु विक्री सुरु आहे. दारू सहज उपलब्ध होत असल्याने गावागावात व्यसनाधिनता वाढत असल्याने महिलांवरील अत्याचार, उपासमारी व गुन्हेगारी यामध्ये चिंताजनक वाढ होत आहे. प्रामुख्याने महिला, मुला-बाळांवर पर्यायाने देशाच्या निकोप उन्नतीवर विपरीत परिणाम होत आहे. ज्या कुटुुंबातील कर्ते पुरुष दारुमुळे बळी गेले आहेत, त्या कुटुुंबांवर आलेले दु:ख आम्ही आमचे मानतो, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घटनेला जबाबदार असणाऱ्या यंत्रणेचा व शासनाचा सिमांतिनी महिला संघटनेतर्फे निषेध करण्यात येत आहे, असे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दारुबंदीसंदर्भात स्वतंत्र खाते असून, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. दारुबंदीसाठी संपूर्ण अधिकार पोलीस यंत्रणेकडे दिल्यास यावर ठोस पर्याय काढता येईल, असे पोलीस म्हणाले. मात्र, आमच्या निदर्शनास येणारे गावठी दारु धंदे कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रत्यक्षात आता अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. महिलांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर तरी पोलिसांकडून दारूधंदे बंद केले जातील, अशी अपेक्षा केली जात आहे. (वार्ताहर) मकेश्वर यांची घेतली भेट चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांप्रमाणे संपूर्ण राज्यात गावठी व देशी दारु बंद करण्यासाठी कडक उपाययोजना करावी, महाराष्ट्राची शान व अभिमान असलेल्या पोलीस यंत्रणेचे जाळे गावापासून जिल्ह्यात विखुरलेले असताना शासनातर्फे बंदी असलेली गावठी दारु सर्वत्र विकली जाते. ही बाब पचनी पडणारी नसून, जिल्ह्यात मालवणी होईपर्यंत यंत्रणेने वाट पाहू नये. गावात दारु आढळल्यास पोलीस पाटील यालाच जबाबदार धरण्यात यावे, कारण अनेक गावात पोलीसपाटील हे स्वत: दारु पिणारे आहेत. दारुबंदीसाठी महिलांनी जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता अनेक आंदोलने चालविली आहेत. त्यांना पोलीस यंत्रणेने संरक्षण देऊन त्यांच्या मागे कायद्याचे बळ द्यावे, आदी मागण्या सिमांतिनी महिला संघातर्फे करण्यात आल्या आहेत. कारवाईचा केवळ फार्स : बंदी असलेल्या गावठी दारूच्या विक्रीकडे डोळेझाक गुहागर : प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे चालणाऱ्या दारु व्यवसायामुळे मालवणीसारख्या दुर्घटना घडतात. शेकडो कुटुंबांची वाताहात होते. त्यामुळे अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणा आणि शासनाचा संजिवनी महिला संघटनेने लेखी निवेदनाद्वारे निषेध केला. यावेळी संपूर्ण दारुबंदीची मागणी करणारे निवेदन सोमवारी गुहागरचे निवासी नायब तहसीलदार सुहास थोरात यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दारुच्या विळख्यात शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणूस अडकला आहे. शासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे दारु विक्री सुरु आहे. त्यामुळे महिालांवरील अत्याचार, उपासमारी व गुन्हेगारी यामध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ होत आहे. दारुच्या व्यसनामुळे कर्जबाजारी तसेच व्याधीग्रस्त होऊन मरणाला कवटाळणाऱ्या पतीच्या निधनानंतर महिलांना अकाली वैधव्य सोसावे लागते. असंख्य निरपराध महिला व मुलांना हलाखीत दिवस काढावे लागतात. आज राज्यात गावठी दारु विक्रीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुंबईतील मालवणी भागात १८ जून रोजी गावठी दारु पिऊन १०४ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या या थैमानातून प्रशासनाची याबाबतची अनभिज्ञता दिसून येते. दारुमुळे सर्वसामान्यांसह महिला, मुले आणि पर्यायाने देशाच्या उन्नतीवर विपरीत परिणाम होत आहे. शासनाने संपूर्ण राज्यात दारु बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. महिला अनेक वर्षे दारुबंदीसाठी जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता आंदोलने करत आहेत. मात्र, प्रत्येक दुर्घटनेनंतर पोलिसांकडून केवळ दारुधंद्यावर कारवाईचा फार्सच केला जातो. हे थांबवून महिलांना बळ द्यावे. गावातील पोलीसपाटलाला या दारुधंद्याबाबत जबाबदार धरावे व त्यांच्यावर कार्यवाही करावी. राज्यभरात जाळे पसरलेल्या पोलीस प्रशासनाला बंदी असलेली गावठी दारुची विक्री होते हे दिसतच नाही, ही बाब पचनी पडणारी नाही. त्यामुळे आणखी मालवणी होईपर्यंत यंत्रणेने वाट पाहू नये, अशी कळकळीची विनवणी करण्यात आली आहे. यावेळी संजिवनी महिला संघाच्या अध्यक्षा श्वेता विचारे, कोतळूकच्या सरपंच, कार्याध्यक्षा श्रद्धा भेकरे, चिखलीच्या सरपंच, सचिव मानसी कदम, माजी सरपंच श्रुतिका डाफळे, सिद्धी सुर्वे, प्रगती आग्रे, महिला आयोग सदस्य रुपाली गुहागरकर आदी उपस्थित होत्या. महिलांच्या या कृतीमुळे आज गुहागरात तोच एक चर्चेचा विषय ठरला . (वार्ताहर)
गुहागर, चिपळूण : दारूअड्डे उद्ध्वस्त करा, जोरदार घोषणाबाजीत महिलांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
By admin | Published: June 29, 2015 11:18 PM